Loni Kalbhor Crime : व्यापाऱ्याला ३४ लाखांचा गंडा! ‘मका’ खरेदीच्या व्यवहारात असा बसला फटका; वाचा सविस्तर
Loni Kalbhor Crime : सोलापूरच्या व्यापाऱ्याची पुण्यात फसवणूक; आधी विश्वास संपादन केला आणि नंतर ३५ लाखांच्या मालाचे पैसे देण्यास टाळाटाळ.

Loni Kalbhor Crime – कृषीमालाच्या व्यवहारातून विश्वास संपादन करून तब्बल 34 लाख 60 हजार 917 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक विलास मापारे (रा. टाकळी भीमा, शिक्रापूर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी नानासाहेब सुखदेव कौंडुभैरी (वय 50, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. नानासाहेब कौंडुभैरी हे मार्केटयार्ड येथे आडत भुसार व्यापारी असून शेतकर्यांकडून कृषीमाल खरेदी करून तो विविध शहरांतील व्यापार्यांना पुरवतात. मार्केटयार्ड परिसरातील ब्रोकर प्रकाश लोढा यांच्या ओळखीने त्यांचा माणिक मापारे यांच्याशी संपर्क झाला.
ऑक्टोबर 2024 मध्ये मापारे यांनी तातडीने चार ट्रक (सुमारे 120 टन) मक्याची मागणी केली. त्यानुसार माल लोणी काळभोर येथील गुरुदत्त वजनकाट्यावर पाठविण्यात आला. या पहिल्या व्यवहाराचे सुमारे 22. 50 लाख रुपये मापारे यांनी आरटीजीएसद्वारे दिल्याने त्यांच्यावर विश्वास बसला. यानंतर मापारे यांनी आणखी मक्याची मागणी केली.
विश्वास संपादन झाल्यानंतर कौंडुभैरी यांनी वेगवेगळ्या तारखांना पाच ट्रक मका लोणी काळभोर येथे पाठविला. या मालाचे एकूण मूल्य 34 लाख 60 हजार 917 रुपये होते. मात्र माल ताब्यात घेतल्यानंतरही संबंधित व्यापार्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, 25 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला; मात्र तो बँकेत जमा केल्यानंतर बाऊन्स झाला.
त्यानंतर वेळोवेळी पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात रक्कम अदा करण्यात आली नाही. तक्रारीनुसार माणिक मापारे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.





