Pune : मार्केट यार्डात दुचाकीला प्रवेश देण्याची मागणी

पुणे : मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागात पुन्हा दुचाकी सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत दुचाकी सुरू करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशनच्या वतीने बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
येथील बाजारात सकाळी ११ ते १२ या वेळेत दुचाकीला प्रवेश देण्यात येत होता. मात्र, गुरुवारपासून (दि. २७) बाजारात दुचाकीला प्रवेश बंद करण्यात आला आहे. ऐन गुढीपाडव्याच्या पूर्वी काही दिवस आणि आंब्याचा हंगाम सुरू असताना दुचाकीला प्रवेश नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर आडते असोसिएशनची बैठक आज झाली. या वेळी आडते असोसिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक अनिरुद्ध ऊर्फ बापू भोसले, संचालक गणेश घुले, ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ, आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष सौरभ कुंजीर, सचिव करण जाधव, आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अमोल घुले, युवराज काची, माजी सचिव रोहन उरसळ आदी उपस्थित होते.
यामध्ये आडते असोसिएशनचे पदाधिकारी आणि आडते यांच्यामध्ये ‘तू तू- मै मै’ झाल्याचे पाहायला मिळाले. व्हाॅट्स अॅप वरून एका आडत्याने केलेल्या मागणीवरून दुचाकी बंदी करण्यात आली. आता व्हॉट्स अॅप वरून कारभार चालणार आहे का, असा प्रश्न विचारून यापुढे जनरल बॉडीची मीटिंग बोलावून सर्व निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे आडत्यांनी म्हटले.
दरम्यान आडते असोसिएशनच्या निवडणुकीवरही चर्चा झाली. जनरल मीटिंग बोलावून निवडणूक जाहीर करण्याची मागणी करावी, तसेच फळ, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभागाला एकामेकांच्या समस्या समजत नाहीत. त्यामुळे प्रत्येक विभागाला १ वर्षे अध्यक्षपद देण्याची मागणी करण्यात आली. काहींनी वेगळी संघटना काढणार असल्याचेही सांगितले.
१५ फुटाची कारवाई सरसकट का नाही
मार्केट यार्डात गाळ्यापासून १५ फुटांच्या आत शेतीमाल लावून विक्री करणे आवश्यक आहे. १५ फुटांबाहेर माल लावल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, एक आणि तीन क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ कारवाई होत नाही, याचे गौडबंगाल काय, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.





