Vegetable Prices : पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ! कोथिंबिरीची जुडी 51 रुपयांवर; मेथीनेही गाठला उच्चांक
Vegetable Prices : आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यात पिके करपली; कोथिंबीर आणि मेथीच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले

Vegetable Prices – वाढत्या उन्हाच्या झळांमुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरांनी उच्चांक गाठला असून कोथिंबिरीची जुडी तब्बल 51 रुपयांना, तर मेथीची जुडी 31 रुपयांना विकली जात आहे. पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभावात मोठी वाढ झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
बाजार समितीत कोथिंबीर, मेथी, शेपू आणि पालक यांसारख्या पालेभाज्यांची आवक लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. परिणामी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे कमी कालावधीत तयार होणार्या पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके करपल्याने उत्पादनात घट झाली आहे.
मंचर बाजार समितीचे सभापती निलेश (स्वामी) थोरात यांनी सांगितले की, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यातील काही मोजक्याच भागांत सध्या मेथी आणि कोथिंबिरीची पिके तग धरून आहेत. वाढत्या तापमानामुळे शेतकर्यांना उत्पादन टिकवणे कठीण जात आहे.
दरम्यान, बाजारातील आवक कमी असल्याने पुढील काही दिवस पालेभाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला याचा फटका बसत आहे.





