पुणे जिल्हा | वीसगाव खोऱ्यात वटपौर्णिमा उत्साहात

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील वीसगाव, आंबवडे, हिरडस मावळ खोऱ्यात वटपौर्णिमाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमेला वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
वटपौर्णिमा सण नववधु व सुहासिनींनी वटपौर्णिमेचे व्रत पाळत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करून वडाची विधिवत पूजा व वाण वाटून साजरा केला. नववधू,विवाहित महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य,दिर्घायुष्य प्राप्त व्हावे या करिता वट सावित्रीची पूजा मनोभावे करताना पहावयास मिळाल्या.
नवे वस्त्र परिधान करून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताटात फुले, कापसाची पोत, अक्षता, हळदी-कुंकू, उदबत्ती, पांढरा दोऱ्याचा रीळ, मिठाई, आंबा, जांभूळ, करवंद, फणस इत्यादी फळे घेवून शुद्ध पाण्याने भरलेला गडवा (तांब्या) आणि निरांजन सोबत घेवून प्रथमतः वडाच्या झाडाला पाणी वाहून हळदी-कुंकू, अक्षता, फुले कापसाची पोत वहात, झाडाचे औक्षण करून पांढरा दोरा वडाला बांधून ७ वेळा झाडाला प्रदक्षिणा घालत. सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करत, विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशिर्वाद घेताना पहावयास मिळाला.
पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला ,फुगडी,जिम्मा,फेर, पारंपरिक गीतांचे स्वर ग्रामीण भागात ऐकायला मिळाले. नववधु दरवर्षी सासरहून खास सणासाठी येतात. माहेरी येणाऱ्या नवविवाहित वधु,महिलांनी ग्रामीण भागात पारंपरिक पध्दतीने सण उत्साहात साजरा केला.





