Medha Kulkarni: महात्मा फुले वाड्यातील वटपूजनावरून वाद; मेधा कुलकर्णींवर टीकेची झोड, भाजप खासदारांचे स्पष्टीकरण
Medha Kulkarni महात्मा फुले वाडा हा राज्य संरक्षित ऐतिहासिक वारसा असून तो राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. वाड्याच्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाजवळ अनेक वर्षांपासून वटपौर्णिमेनिमित्त पूजा केली जाते. मात्र, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अंधश्रद्धा, रूढी आणि सामाजिक विषमतेविरोधात काम केले होते. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या वारशाशी या ठिकाणी वटपूजन करणे विसंगत असल्याचे पुरोगामी संघटनांचे मत आहे.

Medha Kulkarni: पुण्यातील महात्मा फुले वाड्यात झालेल्या वटपूजनाच्या कार्यक्रमावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पुरोगामी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेत टीका केली. मात्र, आपण केवळ निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो आणि संबंधित कार्यक्रमाला पुरातत्त्व विभागाची परवानगी होती, असे स्पष्टीकरण मेधा कुलकर्णी यांनी दिले आहे.
महात्मा फुले वाडा हा राज्य संरक्षित ऐतिहासिक वारसा असून तो राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. वाड्याच्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाजवळ अनेक वर्षांपासून वटपौर्णिमेनिमित्त पूजा केली जाते. मात्र, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अंधश्रद्धा, रूढी आणि सामाजिक विषमतेविरोधात काम केले होते. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या वारशाशी या ठिकाणी वटपूजन करणे विसंगत असल्याचे पुरोगामी संघटनांचे मत आहे. (Medha Kulkarni)
गेल्या तीन वर्षांपासून काही सामाजिक संघटना या ठिकाणी येणाऱ्या महिलांचे प्रबोधन करण्याचे काम करत आहेत. तरीही यंदाही स्थानिक महिला मंडळाने वटपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित केले होते. कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यावरून वाद अधिकच वाढला. (Medha Kulkarni)
महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठानाच्या सरचिटणीस ॲड. शारदा वाडेकर यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला. त्यांच्या मते, महात्मा फुले वाडा ही राज्य संरक्षित वास्तू असून तिचे ऐतिहासिक आणि वैचारिक महत्त्व जपणे आवश्यक आहे. पुरातत्त्व विभागाने यापूर्वी अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर मुंबई कार्यालयातून त्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. तसेच वाड्याच्या परिसरात झालेल्या सत्कार आणि राजकीय कार्यक्रमामुळे स्मारक संरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Medha Kulkarni: महात्मा फुले वाड्यातील वटपूजनावरून वाद; मेधा कुलकर्णींवर टीकेची झोड, भाजप खासदारांचे स्पष्टीकरण
सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनीही राज्य संरक्षित स्मारकांबाबतची नियमावली सर्वांनी पाळली पाहिजे, असे मत व्यक्त केले. धार्मिक परंपरेच्या नावाखाली नियमांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. (Medha Kulkarni)
दरम्यान, या वादावर राज्य पुरातत्त्व विभागानेही भूमिका स्पष्ट केली आहे. विभागाचे पुणे कार्यालयाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी सांगितले की, मागील काही वर्षांपासून या ठिकाणी वटपौर्णिमेचे कार्यक्रम होत आहेत. गेल्या वर्षी कार्यक्रमादरम्यान दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनाही पत्र पाठवण्यात आले होते. (Medha Kulkarni)
मात्र, वटपौर्णिमेपूर्वी मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून सुधारित मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या. त्यामध्ये पूर्वीपासून सुरू असलेले धार्मिक सण, परंपरा आणि उत्सव सुरू ठेवण्यास परवानगी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार पुणे कार्यालयाने सुधारित आदेश काढून कार्यक्रमाला परवानगी दिली. (Medha Kulkarni)
कार्यक्रमानंतर मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना वटपौर्णिमा हा सण निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा असल्याचे म्हटले. प्रत्येकाने एक झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटले आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महात्मा फुले वाड्यातच वटपूजन करण्यामागे हेतुपुरस्सर भूमिका असल्याचा आरोप केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रवक्ते सुनील माने यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा कार्यक्रम आपण आयोजित केला नव्हता, आपण केवळ निमंत्रित म्हणून उपस्थित होतो. अनेक वर्षांपासून स्थानिक महिला येथे वटपौर्णिमा साजरी करतात आणि यंदाही पुरातत्त्व विभागाच्या अधिकृत परवानगीनंतरच हा कार्यक्रम झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.





