वसुबारस…, आज पहिला दिवा

पुणे – मांगल्य आणि दिव्यांचा सण असणाऱ्या दीपावलीला सोमवारपासून सुरुवात होत आहे. वर्षभरात येणारे सण-उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्याप्रती कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.
वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी. वर्षातील हा दिवस गाय आणि वासराच्या पूजेसाठी राखून ठेवण्यात येतो. पूर्वी घरोघरी गाई होत्या. त्यावेळी गोठ्यातील गायींची पूजा करण्यात येत होती. शहरांमध्ये विविध चौकांत, मंडळांच्या वतीने वसुबारसेनिमित्त गाय वासराच्या पूजनाचे आयोजन करण्यात येते. सायंकाळी गाय वासराचे पूजन करून प्रार्थना करण्यात येते. सोमवारी रमा एकादशी आणि गुरू द्वादशी हे दोन्ही सण एका दिवशी आले आहेत. तर, या द्वादशीला गो-वत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हटले जाते. वसुबारसेला गाय वासराला ओवाळत त्यांना गोड पदार्थ देत त्यांचे पूजन करण्याचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. सायंकाळी देवाजवळ दिवा लावायचा. गोमातेचे पूजन करायचे. गोमातेचे चित्र किंवा प्रतिमेची पूजा करायची, अशी माहिती शारदाज्ञानपीठमचे संस्थापक पंडीत वसंतराव गाडगीळ यांनी दिली.





