Vasant More : पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे आक्रमक नेते व माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी ॲक्ट) दाखल गुन्ह्यात पुणे जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून मोरे (Vasant More) यांच्या अटकेची कारवाई कोणत्याही क्षणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. फायरब्रँड नेते वसंत मोरे अडचणीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे पुण्यातील प्रमुख नेते आणि आक्रमक वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेले वसंत मोरे यांच्यावर दलित समाजाच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पक्षातील त्यांची प्रतिमा धोक्यात आली असून, राजकीय विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. Vasant More मोरे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलिसांना मोरे यांना ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नेमकं प्रकरण काय? प्रकरणाची सुरुवात २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून झाली. या परिषदेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश विश्वनाथ लहाडे यांचे वडील विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय ७२, ठेकेदार) यांच्याबद्दल वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांच्या म्हणण्यानुसार, वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं. हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कुटुंबीयांची सामाजिक बदनामी झाली असून, मानसिक ताण आणि भीतीच्या वातावरणात जीवन व्यतीत करावे लागत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून (Vasant More) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असून, व्हायरल व्हिडिओ आणि इतर पुराव्यांचा अभ्यास सुरू आहे.