Varandha Ghat: वरंधा घाटातून प्रवास करताय? आधी ‘हा’ महत्त्वाचा इशारा वाचा; भोर पोलिसांचे प्रवाशांना आवाहन
Varandha Ghat: हिरडस मावळ खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली.

Varandha Ghat – भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव हद्दीजवळ शुक्रवारी (दि. ३) सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक मोठी दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून हिरडस मावळ खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत; मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सध्या महाड-पंढरपूर महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावर रस्ता जरी चांगला असला, तरी काही ठिकाणी मोऱ्यांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूला मातीचा मोठा भराव टाकल्यामुळे पावसाळ्यात वाहने रुतण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज सकाळी दरड कोसळल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
काही वाहनचालकांनी तत्काळ पर्यायी मार्गांचा वापर केला. शिरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता पोळ यांनी या घटनेची माहिती तातडीने प्रशासनाला दिली. त्यानंतर महामार्ग विभागीय अभियंता राहुल कुलकर्णी आणि प्रोजेक्ट मॅनेजर अशोककुमार मिश्रा यांनी युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली. अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रस्त्यावरील राडारोडा बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
“महाड-पंढरपूर रस्त्याचे काम सुरू असतानाच दरडी कोसळत आहेत. साईड पट्टीवर टाकलेल्या मातीमुळे गाड्या घसरून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. रस्ता बंद झाल्यास दुर्गम गावांचा संपर्क तुटू शकतो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून नागरिकांची दळणवळणाची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि रस्ता सुरक्षित ठेवावा.”
– दत्ता पोळ, सामाजिक कार्यकर्ते, शिरगाव.
“हिरडस मावळातील डोंगरमाथ्यांवर सध्या प्रचंड पाऊस होत असल्याने रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. वाहनचालक आणि प्रवाशांनी मार्गाची व हवामानाची खात्री करूनच काळजीपूर्वक प्रवास करावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.”
– निलेश माने, पोलीस निरीक्षक, भोर




