Heavy Rain Alert : एकीकडे नेत्यांचे मेळावे तर दुसरीकडे वादळी पाऊस! 21 जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता हवामान खात्याने ३ ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. यामुळे राज्यातील २१ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मुंबई आणि कोकणातील हवामान
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ३ ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथा परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सहा जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र
धुळे आणि नंदुरबार येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, तर जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या तीन जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ
विदर्भात पावसाचा जोर अधिक तीव्र असेल, असा अंदाज आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
३ ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: वादळी वारे आणि विजांचा धोका लक्षात घेऊन प्रवास आणि बाह्य कामे करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनीही पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे हवामान विभागाने सुचवले आहे.





