FDA Action : निकृष्ट दर्जाचा हलव्याचा दोन हजार किलो साठा जप्त
FDA Action :

पुणे जिल्ह्यात एफडीएची कारवाई
FDA Action : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पुणे जिल्ह्यातील तळवडे येथील माहीम हलवा भांडारमधून निकृष्ट दर्जाचा संशय असलेला दोन हजार १२ किलो हलवा जप्त करण्यात आला.
या साठ्याची किंमत दोन लाख ४१ हजार ४४० रुपये आहे. तसेच, पुण्यातील जनवाडी येथील बढाई स्वीट्स या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने दि. ६ आणि ७ नोव्हेंबरला राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत सदर कारवाई करण्यात आली. दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि अन्य खाद्यपदार्थांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर मिठाई उत्पादक, विक्रेते आणि खाद्यपदार्थांच्या आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे.
उत्पादन व साठवणुकीतील स्वच्छता, कीड नियंत्रण, अन्नसुरक्षा व्यवस्थापन प्रणालीची नोंदणी, पाण्याचे विश्लेषण अहवाल, कामगारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि खरेदी बिले यांची तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी मिठाई व खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांचा दर्जा, स्वच्छता आणि सुरक्षिततेची खात्री करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले.





