रतन टाटांनी दिला होता मोलाचा सल्ला; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

मुंबई : आज राज्यात सगळीकडे दसरा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर आज शिवसेना – उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल एक किस्सा सांगितला आहे.
काय आहे तो किस्सा?
काही वर्षांपूर्वी रतन टाटा आम्हाला भेटायला मातोश्रीवर आले होते. त्यावेळी रतन टाटा मला म्हणाले की, तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभला आहे. मी जेआरडी यांच्यानंतर टाटा समूहाचा कारभार हाती घेतला तेव्हा विचार करायचो, आता जेआरडी असते तर काय निर्णय घेतला असता? त्यामुळे मला कुठला निर्णयच घेता येत नव्हता.
यानंतर माझ्या लक्षात आलं की, अनेक वर्षे जेआरडींनी मला काम करताना बघितलं आहे, तेव्हाच त्यांनी माझ्याकडे टाटा समूहाची धुरा दिली. तुझंही तसंच आहे. जशी माझी निवड जेआरडींनी केली, तशी तुझी निवड शिवसेनाप्रमुखांनी केली आहे. तू कठीण काळात काय करशील, हे त्यांनी बघितलं आहे आणि त्यामुळेच तुझ्याकडे पक्षाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे तुला जे योग्य वाटेल ते कर, असे रतन टाटा यांनी मला सांगितले. त्यामुळेच मी मला योग्य वाटतात, तेच निर्णय घेतो, असे उद्धव ठाकरे आजच्या दसरा मेळाव्यात म्हणाले आहेत.
भाजपवर केली टीका
मी भाजपला लाथ घातली कारण त्यांचं हिंदुत्त्व हे गोमुत्रधारी आणि बुरसटलेलं होते. मी बाळासाहेबांचा विचार कुठेही सोडलेला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.





