Valmik Karad : वाल्मिक कराड ‘CID’ला शरण येताच सुरेश धस म्हणतात, “तो स्वखूशीने शरण…”

Suresh Dhas | Valmik Karad : गेल्या २२ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्सोजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यात तीव्र संतापाची लाट आहे. अशातच बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात जाऊन सेरेंडर केले आहे. त्या अगोदर कराडेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला होता.
या व्हिडिओत त्याने खंडणीचा खोटा गुन्हा आपल्यावर दाखल करण्यात आला आहे. तसेच देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव आले होते. बीड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना अचानक कराडने पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला आहे.
वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात शरण आल्यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “वाल्मिक कराड हा काही स्वखूशीने शरण आला नाही. त्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार होती. त्याच्या पत्नीला चौकशीला घेऊन येणार होते. तर त्याची बँक खाती गोठवण्यात आली होती. त्यामुळे तो सीआयडीकडे शरण आल्याचा दावा आमदार धस यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात जातीने लक्ष घातले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ॲक्शन घेतल्यानंतर ते शरण आल्याचा दावा धसांनी केला.
त्याच्या प्रॉपर्टी शीज करण्याची आता कोर्टाकडे सीआयडीने परमिशन मागितलेली आहे. साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही प्रक्रिया सुरू होईल. ही न्यायालयीन बाब आहे. त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही. परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज जप्त झाल्या पाहिजेत असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
वाल्मिक कराडने व्हिडीओत काय सांगितले पाहा…
दरम्यान, पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी कराडवर गुन्हा दाखल आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर 22 दिवसांनी तो सीआयडीला शरण आला. सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने व्हीडिओ शेअर करत भूमिका मांडली होती. ‘संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे,’ असे वाल्मिक कराडने व्हिडीओत म्हटले आहे.





