“वैष्णवीच्या कुटुंबीयांकडून महिला आयोगात…”; मृत्यू प्रकरणाबाबत रुपाली चाकणकरांनी दिली माहिती, नेमकं काय म्हणाल्या?

Rupali Chakankar : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण चर्चेत आहे. या मृत्यू प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी देखील पोलिस आयुक्तांना या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य महिला आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाबाबत नवी माहिती दिली आहे.
वैष्णवीच्या कुटुंबीयांकडून महिला आयोगात कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे. तसेच वैष्णवीने आयुष्याचा केलेला शेवट हा अत्यंत दुर्देैवी असल्याचे देखील चाकणकर म्हणाल्या. वैष्णवीच्या नणंद करिष्मा हगवणे हिने ६ नोव्हेंबर २०२४ ला राज्य महिला आयोगात आपला भाऊ आणि भावजय विरोधात तक्रार दिली होती. ७ नोव्हेंबर २०२४ ला राज्य महिला आयोगाने यावर तातडीने दखल पौंड पोलीस स्टेशनला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कुटुंबीयांचे कौन्सलिंग करत वाद मिटवण्यात आला होता. अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेची दिनांक १९ मे २०२५ रोजी स्वाधिकारे दखल घेत राज्य महिला आयोगाने पुणे पोलीसांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.@Maha_MahilaAyog@CPPuneCity… pic.twitter.com/C9rlwZezVj
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 21, 2025
वैष्णवीने जी आत्महत्या केली. त्यासंदर्भात तिच्या स्वतःकडून किंवा तिच्या माहेरच्या लोकांकडून राज्य महिला आयोगाला कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल करत १९ मे ला पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
राजेंद्र हगवणे राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदावर नव्हते
या प्रकरणात वैष्णवी हिच्या माहेरच्या ५ आरोपींपैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी (सासरा आणि दीर) फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या चार टीम तैनात करण्यात आल्याची माहिती देखील चाकणकर यांनी दिली आहे. व्यक्ती कोणत्याही पदावर असू दे किंवा कोणीही असू दे तो गुन्हेगार आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदावर नव्हते. त्यांचा मुलगा हा संघटनेमध्ये काम करत होता, अशी माहिती त्यांनी दिली. हुंडाबंदीसाठी राज्यात मोठी मोहीम राबवली जाते. यापुढे जर कोणी हुंडा मागत असेल, तर तातडीने पोलिसांत तक्रार करा, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले.





