Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीची आत्महत्या नसून ही हत्याच; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ

Vijay Wadettiwar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेत 16 मे रोजी आत्महत्या केली. या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, नणंद करिष्मा, दीर सुशील यांना अटक केले आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून राज्य महिला आयोगावर टीका केली जात आहे. विरोधकांकडून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे.
या भेटीनंतर विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, पैशासाठी होणाऱ्या सासरच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या स्व. वैष्णवी हगवने हिचे आई- वडील आणि कस्पटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. वैष्णवीच्या आई वडिलांच्या वेदना आज शब्दांत मांडता येण्यासारख्या नाहीत, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
पुढे म्हणाले की, वैष्णवीच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरून हे स्पष्ट होते की, ही आत्महत्या नसून सरळसरळ हत्या आहे. इतकी गंभीर घटना घडून देखील पोलीस कारवाई संथ गतीने सुरू आहे, हे अत्यंत दुःखद आहे, असंही ते म्हणाले.
राज्य महिला आयोगाने स्वतःहून कारवाईस पुढाकार न घेणे हे महाराष्ट्रासाठी खरोखर लज्जास्पद आहे. सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष देऊन वैष्णवी, तिच्या ९ महिन्याच्या बाळाला आणि कस्पटे कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी
राज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. करुणा मुंडे यांनी देखील आयोगाच्या अध्यक्षांबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. रुपाली चाकणकर या फक्त आपल्याकडे ३५००० महिलांच्या तक्रारी आल्याचे सांगत आहेत.
मात्र, त्यातील किती तक्रारींचा निपटारा केला, याबाबत त्या सांगत नाहीत. मी देखील सहा कंप्लेंट करून त्यांनी माझ्या कंप्लेंटवर कोणतीही कारवाई केली नसल्याच्या आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.





