Vaishnavi hagawane case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; फरार निलेश चव्हाण नेपाळ सीमेवरून अटक

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून शुक्रवारी (३० मे) अटक केली. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. वैष्णवीच्या कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याच्या आरोपाखाली तो गेल्या आठवड्याभरापासून फरार होता. पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलिसांची एकूण सात पथके त्याचा शोध घेत होती.
वैष्णवी हगवणे (वय २४) हिने १६ मे रोजी भुकूम येथील सासरच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक, सासू लता, दीर सुषील, जाऊ करिश्मा आणि सासरे, माजी राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांना यापूर्वीच अटक झाली आहे.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे १० महिन्यांचे बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात होते. वैष्णवीचे कुटुंबीय बाळाला घेण्यासाठी गेले असता, चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात २२ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. तसेच, बावधन पोलीस ठाण्यात दाखल वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात २४ मे रोजी चव्हाणला सहआरोपी करण्यात आले. त्याच्यावर बाळाची हेळसांड आणि धमकी दिल्याचे आरोप आहेत. चव्हाणला पकडण्यासाठी पोलिसांनी ‘स्थायी वॉरंट’ जारी केले होते. त्याच्या मालमत्तेची जप्तीची प्रक्रियाही सुरू आहे.





