Vaikunth Crematorium: वैकुंठ स्मशानभूमीचे शुक्लकाष्ठ संपता संपेना
Vaikunth Crematorium:

अपुरी प्रकाशव्यवस्था, अस्वच्छतागृहे, भटक्या कुत्र्यांची दहशत
Vaikunth Crematorium: शहराच्या मध्यवर्ती आणि सर्वाधिक ताण असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीतील समस्यांचे शुक्लकाष्ठ संपता संपेना अशी स्थिती आहे.
गळके छप्पर, अंत्यसंस्काराला आलेल्या आप्तेष्टांना पावसाळ्यात उभे राहण्यासाठी आडोसाही नाही, अशा अनेक तक्रारी इतके दिवस होत्याच. मात्र, आता त्यात अपुरी प्रकाशव्यवस्था, स्वच्छतागृहांची दूरवस्था, पाण्याची कमतरता, अस्वच्छता आणि भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची भर पडली आहे.
महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे विविध समस्या निर्माण झाल्या असून, वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचे वैकुंठातील समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे या सगळ्या स्थितीवरून सिद्ध होत आहे.
वैकुंठ स्मशानभूमी ही शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि सर्वात जुनी स्मशानभूमी आहे. शहरात दररोज होणाऱ्या अंत्यसंस्कारांपैकी साठ- सत्तर टक्के अंत्यसंस्कार वैकुंठमध्येच होतात. त्यामुळे या स्मशानभूमीवर अधिक ताण येतो. येथे तीन विद्युतदाहिनी, एक गॅसदाहिनी, तसेच पारंपरिक दहनासाठी २४ शेड्स आहेत.
वैकुंठ स्मशानभूमीच्या परिसरातील झाडे उंच वाढलेली आहेत. त्यामुळे दुपारनंतर येथे अंधार पडतो. विशेषत: प्रवेशद्वाराकडून विद्युतदाहिन्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव आहे.
येथील भिंतींवर लावलेले दिवे केवळ शोभेपुरते असून, ते कार्यरत नसल्याने सायंकाळनंतर तेथील अंतर्गत रस्त्यांवर अंधार असतो. विद्युतदाहिनीबाहेरील नळकोंडाळ्यावर असलेल्या आठ नळांपैकी केवळ दोनच नळांना पाणी होते. स्वच्छतागृहांचीही नीट स्वच्छता नाही, काही स्वच्छतागृहात पाणी नाही, अशी स्थिती सोमवारी पाहायला मिळाली.
याशिवाय रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत भटक्या कुत्र्यांचा भीतीदायक वावर आहे. त्यांची दहशतच याठिकाणी निर्माण झाली आहे, तसेच झाडांचा पालापाचोळा, अंत्यविधीसाठी आणलेले हार, फुले आणि अन्य साहित्य याची नियमित स्वच्छता केली जात नाही, तसेच येथे उभारण्यात आलेले कारंजे सध्या बंद असल्याने त्यात पाणी साचून राहिल्याने त्यात डासांची पैदास होण्याची भीती आहे.





