Vaibhav Sooryavanshi Reply : ‘देवानेच लावून दिलीये चिप…!’, बॅटमध्ये ‘AI’ चिप असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी विश्लेषकाची वैभवने केली बोलती बंद
Vaibhav Sooryavanshi Reply : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटनेच नव्हे, तर आपल्या उत्तरानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Vaibhav Suryavanshi Reply on AI Chip Video Viral : आयपीएल २०२६ चा नवा ‘सेन्सेशन’ ठरलेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटनेच नव्हे, तर आपल्या उत्तरानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे क्रिकेट विश्लेषक नौमान नियाझ यांनी वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये ‘AI चिप’ असल्याचा दावा केला होता. आता यावर वैभव सूर्यवंशीने आपल्या शैलीत उत्तर देत सर्वांची मने जिंकली आहेत.
राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने १६ चेंडूत ४३ धावांची स्फोटक खेळी करत पुन्हा एकदा ‘ऑरेंज कॅप’वर कब्जा मिळवला. मात्र, या खेळीपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती वैभवने पाकिस्तानी क्रिकेट तज्ज्ञ नौमान नियाझ यांना दिलेल्या उत्तराची, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वैभवने पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाला दिले चोख प्रत्युत्तर –
𝘉𝘢𝘵 𝘱𝘦 𝘈𝘐 𝘤𝘩𝘪𝘱 𝘩𝘢𝘪 𝘬𝘺𝘢 𝘵𝘶𝘮𝘩𝘢𝘳𝘦?
Vaibhav answers 😂💗 pic.twitter.com/uZcqABbaGS
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2026
काही दिवसांपूर्वी नौमान नियाझ यांनी वैभवच्या ताकदीवर शंका घेत म्हटले होते की, “हा मुलगा नक्की कोण आहे? याच्या बॅटची प्रयोगशाळेत तपासणी करा, कदाचित याने बॅटमध्ये AI चिप वापरली असावी.” या आरोपावर राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या व्हिडिओत वैभवने हसत उत्तर दिले. तो म्हणाला, “माझ्या बॅटमध्ये देवानेच चिप लावून दिली आहे. त्याने वरूनच मला सांगितलं होतं की, तुझ्या बॅटमध्ये काहीतरी खास लावून देतोय आणि मी त्याच ‘चिप’चा वापर करतोय.” वैभवच्या या उत्तराने पाकिस्तानी एक्सपर्टची बोलती पूर्णपणे बंद केली आहे.
आंद्रे रसेलचा ऐतिहासिक विक्रम मोडला –
पंजाबविरुद्धच्या ४३ धावांच्या खेळीदरम्यान वैभवने आयपीएल २०२६ मध्ये आपल्या ४०० धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, अवघ्या १६७ चेंडूंत त्याने हा टप्पा गाठला आहे. आयपीएल इतिहासात सर्वात कमी चेंडूंत एका हंगामात ४०० धावा करण्याचा विक्रम आता वैभवच्या नावावर झाला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये आंद्रे रसेलने १८८ चेंडूंत ४०० धावा पूर्ण केल्या होत्या. अवघ्या १५ व्या वर्षी जागतिक विक्रम मोडीत काढणाऱ्या वैभवने सध्या क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.





