Vaibhav Sooryavanshi Records : भारतीय क्रिकेटचा ‘वैभव’शाली सूर्य
Vaibhav Sooryavanshi Records : ज्या वयात इतर मुले अभ्यासाच्या दडपणाखाली दप्तराचे ओझे वाहत स्पर्धांना सामोरे जातात, तिथे वैभव जगातील नामवंत गोलंदाजांना निधड्या छातीने सामोरा जात आहे.

Vaibhav Sooryavanshi Records : नुकतेच आयपीएल २०२६ चे पर्व संपले आणि सध्या क्रिकेट जगतात फक्त एकाच नावाची चर्चा सुरू आहे; ती म्हणजे षटकारांचा बादशहा आणि भारतीय क्रिकेटचा उगवता सूर्य म्हणजेच वैभव सूर्यवंशी. अवघे पंधरा वर्षांचे कोवळे वय, चेहऱ्यावर अजून मिसरूडही फुटलेले नाही, पण आभाळाला गवसणी घालण्याची जिद्द उराशी बाळगून हा मुलगा मैदानात उतरतो. ज्या वयात इतर मुले अभ्यासाच्या दडपणाखाली दप्तराचे ओझे वाहत स्पर्धांना सामोरे जातात, तिथे वैभव जगातील नामवंत गोलंदाजांना निधड्या छातीने सामोरा जात, आपल्या डाव्या हाताने धूळ चारताना दिसतो.
रोजचा २०० किमीचा प्रवास आणि आई-वडिलांचे अपार कष्ट
बिहारमधील समस्तीपूरसारख्या अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वैभवचा जन्म झाला. त्याने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षापासून हातात बॅट घेऊन खेळायला सुरुवात केली होती. त्याच्या या यशात त्याच्या आई-वडिलांचे मोलाचे योगदान आहे. वैभवला क्रिकेटचे योग्य प्रशिक्षण मिळावे म्हणून त्याचे वडील त्याला रोज समस्तीपूरवरून पाटण्याला घेऊन जायचे. रोजचा तब्बल २०० किलोमीटरचा प्रवास, रोज किमान १००० चेंडूंचा सराव आणि ६ ते ७ तास मैदानावर घाम गाळणे; या अथक परिश्रमांच्या जोरावरच आज वैभव इतरांपेक्षा वेगळा ठरला आहे. आता वैभवपेक्षा त्याची बॅट आणि त्याचे रेकॉर्ड्सच जास्त बोलतात.
आयपीएल २०२६ चा ‘ऑरेंज कॅप’ विजेता आणि ख्रिस गेलचा रेकॉर्ड उद्धवस्त!
यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करून ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी ठरलेला वैभव सध्या सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळेच राजस्थान रॉयल्स संघाला एलिमिनेटर राउंडपर्यंत मजल मारता आली; ज्यामध्ये वैभवचा सिंहाचा वाटा होता. याच स्पर्धेत त्याने ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा एकाच आयपीएल हंगामात ५९ षटकार मारण्याचा १३ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. आज वैभवच्या नावावर एकाच स्पर्धेत तब्बल ७२ खणखणीत षटकार मारण्याचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे.
दिग्गज गोलंदाजांमध्ये वैभवची दहशत!
वैभव जेव्हा मैदानावर खेळतो, तेव्हा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण नसते. पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क, राशिद खान आणि जोश हेझलवूड यांसारख्या जगातील सर्वात घातक आणि नामांकित गोलंदाजांची वैभवने अक्षरशः धुलाई केली आहे. गोलंदाज समोर कोणीही असो, मैदानाच्या चारी दिशांना स्वैरपणे फटकेबाजी करण्यात वैभव तरबेज आहे. आज जगातील मोठ्या क्रिकेट तज्ज्ञांना वैभवच्या खेळाने भुरळ पाडली आहे. प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू वारंवार वैभवचे व्हिडीओ पाहून त्याला बाद करण्यासाठी नवनवीन रणनीती आखत आहेत, हेच वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी वैभवने मिळवलेले सर्वात मोठे यश आहे. मैदानावर वैभव आऊट झाल्यावर विरोधी संघातील गोलंदाज सुटकेचा निश्वास सोडतात, एवढी दहशत त्याने निर्माण केली आहे.
२३७ चा स्ट्राईक रेट अन् ५ पुरस्कारांवर ताबा
नुकत्याच पार पडलेल्या ‘युवा एकदिवसीय विश्वचषक’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध अवघ्या ८० चेंडूंमध्ये १७५ धावांचे वादळी योगदान देत त्याने भारताला विश्वविजेते बनवण्यात मोठा वाटा उचलला होता. वैभवच्या या उत्तुंग कामगिरीनंतरही राजस्थान रॉयल्स संघ दुर्दैवाने आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचू शकला नाही. मात्र, या आयपीएल हंगामात वैभवने २३७.३० च्या अद्भूत स्ट्राईक रेटने १६ डावांतून ७७६ धावा कुटल्या. यामध्ये २९ चेंडूंत ९७ धावा, ३८ चेंडूंत १०१ धावा आणि ४७ चेंडूंत ९६ धावा अशा वादळी खेळींचा समावेश आहे. सर्वात कमी सामन्यांमध्ये आयपीएलमध्ये १,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रमही आता त्याच्याच नावावर आहे. या अफाट कामगिरीमुळे एकाच हंगामात तब्बल ५ वैयक्तिक पुरस्कारांचा तो मानकरी ठरला.
संस्कार जपणारा निरागस खेळाडू; ख्रिस गेलने केली भविष्यवाणी
वैभवचा निरागसपणा केवळ त्याच्या बोलण्यातूनच नाही, तर वागण्यातूनही ठळकपणे जाणवतो. आज मैदानावर कोणताही ज्येष्ठ खेळाडू दिसला, तर चटकन त्याच्या पाया पडायला वैभव कधीच चुकत नाही. वैभवला सध्या ख्रिस गेलचा आयपीएलमधील वैयक्तिक १७५ धावांचा सर्वोच्च रेकॉर्ड खुणावत आहे. वैभव नक्कीच हा विक्रम मोडीत काढेल यात शंका नाही, आणि दस्तुरखुद्द ख्रिस गेलनेही हीच भविष्यवाणी केली आहे. आता वैभवला भारतीय सीनियर संघातही संधी मिळाली आहे.
क्रिकेटचा देव सचिनने दिला मोलाचा सल्ला –
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या मते, “वैभवला सध्या त्याचा नैसर्गिक खेळ खेळू दिला पाहिजे. आत्ताच त्याला कोट्यवधी फॅन्सच्या अपेक्षांच्या दडपणाखाली ठेवणे योग्य ठरणार नाही. वयाच्या परिपक्वतेनुसार तो कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटच्या आव्हानांना निश्चितच यशस्वीपणे सामोरा जाईल.” विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये, जिथे खऱ्या अर्थाने खेळाडूचा कस लागतो आणि खेळपट्टीवर विपरीत परिस्थितीत दबावाखाली बॅटिंग करावी लागते; या कठीण आव्हानाला वैभव येणाऱ्या दिवसांत कसा सामोरा जातो, हे पाहणे रंजक ठरेल.





