वडेट्टीवारांच्या लेकीचे आक्रमक भाषण; वीज गेल्यामुळे भर सभेत केली महावितरणला शिवीगाळ

Shivani Vijay Wadettiwar | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांनी जोर धरला. विविध पक्षाच्या दिग्गज नेतेमंडळींकडून शहरातील विविध भागात सभा घेतल्या जात आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे राज्यात काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करीत असल्याने त्यांची लेक शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
एका सभेदरम्यान लाईट गेल्याने मोबाईलच्या टॉर्चवर सभा घेत शिवानी वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. तसेच वीज गेल्याने त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर संतापून शिवीगाळ केली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील आकापूर गावात शिवानी वडेट्टीवार यांनी वडिलांच्या प्रचारानिमित्त कोपरा सभा घेतली. यावेळी त्यांनी अतिशय आक्रमक अंदाजात भाषण केले.
मोबाईलच्या टॉर्चमध्ये घेतली सभा
सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहे. ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यात येणाऱ्या आकापूर या गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक दिवस येथील विद्युत पुरवठा ठप्प असते. जेव्हा शिवानी वडेट्टीवार गावात पोहोचल्या त्यावेळी बत्तीगुल देखील होती. मोबाईलच्या टॉर्चमध्ये त्यांनी सभा घेतली. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरताना त्यांनी शिवीगाळ केली. विकास गुजरातचा होत आहे, तुमच्या गावाचा नाही. तुमचे जीवनात अंधार पेरण्याचे कार्य भाजप करीत आहे, असे शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या. Shivani Vijay Wadettiwar |
आकापूर गावातील भाषणादरम्यान वीज गेल्याने त्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. “सर्वसामान्य लोकांचे जीवन अंधारात टाकण्याचे काम भाजपचे सरकार करत आहे. महावितरणवाल्यांना झापणार तर आहे, XXXरात्रभर वीज घालवूनही यांना ८००-१००० रुपये बील पाठवायला लाज वाटत नाही. सत्तेत आले तर वीज मंडळाला धडा शिकवू, असे त्या म्हणाल्या. वीज मंडळाविषयी आणि अधिकाऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने शिवानी वडेट्टीवार अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यावरून आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “आजचा विरोधी पक्षनेता हा उद्याचा मुख्यमंत्री असतो. म्हणून विजुभाऊंना मोठ्या बहुमतांनी निवडून द्या, विजुभाऊ निवडून आले तर मोठ्या पदावर जाणार आहेत, हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा, समोरील उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने पहिल्यांदा आमदार झाल्यावर विधिमंडळात काम कसं चालतं, निधी कसा आणतात, निधी कुठून आणतात, कसा आणतात हे समजायला त्याला १० वर्षे लागतील. त्यामुळे विजुभाऊंना निवडून द्या,” असे आवाहन शिवानी वडेट्टीवार यांनी केले. Shivani Vijay Wadettiwar |
दरम्यान, ब्रम्हपुरी मतदारसंघात विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासमोर भाजपने कृष्णलाल सहारे हा कुणबी समाजातील उमेदवार दिला आहे. येथे काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत पहायला मिळणार आहे.
हेही वाचा:
“…तर मोठ्या मनाने माफ करा”; सुरज चव्हाणने मागितली चाहत्यांची माफी





