24 तासांत 52 लाख जणांचे लसीकरण

नवी दिल्ली – देशातील लसीकरण मोहिमेत काल 58 कोटींचा टप्पा पार केला. देशात गेल्या 24 तासांत लसीच्या 52,23,612 मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने काल 58 कोटी 14 लाखांचा टप्पा पार केला.
गेल्या 24 तासांत 38,487 रुग्ण कोविडमुक्त झाल्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) कोविडमधून बरे झालेल्यांची संख्या आता 3,16,36,469 झाली आहे. परिणामी, भारताचा रोगमुक्ती दर सध्या 97.57% असून हा मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2 % आहे, हा दर गेले 58 दिवस 3% हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील आज 1.95% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आता गेले 27 दिवस 3% हून कमी आणि सलग 76 दिवस 5% हून कमी राहिला आहे.





