Satara News : बालमृत्यू टाळण्यासाठी अन् प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीकरण ठरतेय उपयुक्त

सातारा : जन्माला आलेल्या बाळाच्या संगोपनातला महत्त्वाचा भाग म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा राजमार्ग असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. लसीत सबळ जंतू नसल्याने रोग तयार होत नाही, पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या लसी शरीरात देणे बाळांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
बाळाच्या जन्मापासून वेगवेगळ्या लसी दिल्या जातात. या लसीकरणामुळे वातावरणामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता कमी केली जाते. अनेक लसी आजार टाळण्यासाठी उपयोगाला येतात. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही लसीकरण उपयुक्त ठरते.
लहान मुलांचे कर्दनकाळ असलेले घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ यासारखे आजार हे रोगप्रतिबंधक लस दिल्याने टाळता येतात. शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूती झाल्यानंतर मोफत लसीकरण केले जाते. बालकांना विविध आजार होण्याची शक्यता असल्याने पालकांनी लसीकरणासाठी जागृत राहून मुलांना वेळच्यावेळी लस द्यावी.
१) आजार होऊच न देणे महत्वाचे
घरातील बाळ आजारी पडल्यावर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. पोलिओ सारख्या जायबंदी करणाऱ्या आजारापासूनही लसी संरक्षण देत आहेत. काही लसीमुळे शरीरात निर्माण होणारी रोगप्रतिकारक शक्ती काही काळानंतर कमी होते, त्यामुळे ठराविक अंतराने त्या लसी पुन्हा दिल्या जातात. याचे वेळापत्रक चुकवू नये असे तज्ज्ञ सांगतात.
२) कोणत्या वयात कोणती लस?
बाळाला वयानुसार विशिष्ट लस देणे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्याचे विविध आजारांपासून संरक्षण होईल. जन्मापासून ते ६ वर्षांपर्यंतच्या बाळांना अनेक लस दिल्या जातात, ज्यात हिपॅटायटीस ए, हिपॅटायटीस बी, रोटाव्हायरस, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिमोफिलस इन्फ्लूएंझा प्रकार बी, पोलिओ, कोविड, फ्लू, न्यूमोकोकल रोग, गोवर, गालगुंड, रुबेला आणि कांजिण्या यांचा समावेश असतो.
३) मोफत लसीकरण कोठे?
बाळाला लसीकरण करण्यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिपॅटायटिस बी हा आजार बाळाच्या लिव्हरला हळूहळू नुकसान पोहोचवू शकतो. हा विषाणू रक्तामध्ये आणि शरीरातील इतर द्रव्य घटकांमध्ये आढळून येतो आणि खूप महिने जिवंत असतो. या विषाणू पासून कर्करोग होऊ शकतो.
४) बाळाच्या आरोग्यासाठी लसीकरण आवश्यक
लस्सी मध्ये रोग निर्माण करणाऱ्या एखाद्या जिवाणूचे काही कमकुवत किंवा निष्क्रिय अंश असतात शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीला हल्ला करणाऱ्या विषाणूला ओळखण्यासाठी ही लस मदत करते. बाहेरून होणाऱ्या आक्रमणाला रोखण्यासाठी शरीर अँटीबोडीज तयार करते. बाळ जन्माला आलं की सर्वाधिक काळजी ही त्याच्या आरोग्याची घ्यावी लागते. नवजात बाळाचे शरीर हे तुलनेने कमकुवत असते.
मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अर्भकाला एचडी व्ही लसीचे तीन ते चार डोस मिळावे अशी शिफारस केली होती ज्याचा पहिला डोस जन्माच्या 24 तासांच्या आत दिला जातो. याबरोबरच बाळांना निर्धारित केलेल्या वेळेत आणि वयात लसीकरण देणे त्याच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.
– डॉ. पुजा निकम, बालरोग तज्ज्ञ





