पिंपरी | अनेक गावांमध्ये जनावरांना लम्पीची लागण

हिंजवडी, {रमेश ससार} – मुळशी तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या जनावरांना लम्पीच्या महाभयंकर आजाराने ग्रासले आहे. अनेक जनावरांच्या अंगावर गाठी आल्या असून त्या फुटल्याने दिवसभर रक्तस्राव होत आहे.
परिणामी जनावरांनी चारा पाणी सोडले आहे. तर मुक्या जनावरांच्या डोळ्यातील पाणी व त्यांच्या व्यथा वेदना पाहून पशुधनाची जोपासना करणारा शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला आहे.
मात्र अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत तालुक्याचा पशुधन विकास विभाग कानावर हात ठेवून मुक्या जनावरांचा इलाज करण्यात अपयशी ठरत असल्याने नाइलाजास्तव अनेकजण खासगी डॉक्टरांना बोलवून जनावरांवर उपचार करत आहेत.
अनेक गावामध्ये सरकारी यंत्रणेची मदत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना महागड्या डॉक्टरांची उपचारासाठी मदत घ्यावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव मुळशीत पाहायला मिळत आहे.
१८ पैकी १२ दवाखाने बंद
मुळशीत राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाचे 9 तर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या पशू संवर्धन विभागाचे 9 असे एकूण 18 दवाखाने आहेत.
परंतु राज्य सरकारच्या दवाखान्यात केवळ 1 एक डॉक्टर तर जिल्हा प्रशासनाच्या 9 पैकी केवळ 5 ठिकाणी असे मिळून तालुक्यात फक्त 6 ठिकाणी डॉक्टर कार्यरत आहेत.
त्यामुळे उर्वरित 12 दवाखाने बंदच पडल्याचे चित्र आहे. 12 गावातील पशुसंवर्धन केंद्रावर डॉक्टरच नसल्याने शेतकऱ्यांनी धाव घ्यायची कुठे आणि कोणाकडे असा मोठा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
काही गावामधील डॉक्टरांच्या बदल्या तर काही डॉक्टर सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागा अद्याप भरल्या नाहीत. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळावर अतिरिक्त गावांचा पदभार सोपवून काम केले जाते. परंतु अनेक गावांचे चार्ज असल्याने उपलब्ध डॉक्टरही टोलवाटोलवी करत असल्याचे चित्र मुळशीत पहायला मिळत आहे .
रिक्त पदे असलेल्या गावांची नावे पुढीलप्रमाणे
जिल्हास्तरीय – नेरे,आडमाळ, शेडाणी, भांबर्डे
राज्यस्तरीय – कुळे, कोळवण, कोळावडे, रिहे, उरावडे, माले, कोंढवळे, अंबडवेट या गावांच्या एकूण 12 दवाखान्यात डॉक्टर पदे रिक्त आहेत.
मुळशी तालुक्यातील 34 हजार जनावरांसाठी शासनाकडून लम्पी प्रतिबंधक लस आली होती. त्यापैकी सुमारे पंधरा हजारापेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण आम्ही मुदतीपूर्वी केले आहे.
तर उर्वरित लसीकरण राज्य सरकारच्या विभागाने केले आहे. परंतु किती जनावरांना लम्पी ची लागण झाली आहे याची आकडेवारी आमच्या कार्यालयाला अद्याप प्राप्त झाली नाही.
ज्या जनावरांना लसीकरण झाले आहे त्यांना फारसा धोका नाही. लसीकरणाबाबत काही शेतकरी देखील उदासीन असल्याचे जाणवले. एस. एस. हिंगाडे, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती विस्तार )
शेतकऱ्यांनी मुलाबाळाप्रमाणे जतन केलेले पशू मरणयातना सहन करत आहेत. अनेक ठिकाणी गाई, म्हशी, बैल यांना लम्पीची लागण झाल्याने शेतकऱ्यांनी कुणाकडे संपर्क साधायचा हा मोठा प्रश्न आहे.
सरकारी डॉक्टर गावामध्ये येत नसल्याने खासगी डॉक्टर बोलवले तरी ते देखील मनमानी पद्धतीने पैसे उकळतात. यावर नियंत्रण आणणार कोण असा प्रश्न पडतो. – एक पीडित शेतकरी





