कौटुंबिक न्यायालयात १०० जणांचे लसीकरण

पुणे : शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात शनिवारी पुणे महापालिकेच्या सहकार्याने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली.
लसीकरण मोहिमेत कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश, वकील तसेच कर्मचारी वर्ग अशा शंभरजणांचे लसीकरण करण्यात आले. कौटुंबिक न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्ष अॅड. वैशाली चांदणे यांनी लसीकरण मोहिमेसाठी प्रयत्न केले होते.
महापालिकेच्या सहकार्याने शनिवारी लसीकरण मोहिम राबविण्यात आली. लसीकरण मोहिमेत शंभरजणांना लस देण्यात आली. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश मनीषा काळे, वकील संघटनेच्या उपाध्यक्ष प्रगती पाटील, वकील तसेच कर्मचारी वर्ग आदी याप्रसंगी उपस्थित होते.
यापुढील काळात कौटुंबिक न्यायालयातील वकील, कर्मचारी वर्गाचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अॅड. चांदणे यांनी सांगितले.





