ट्रम्पची ब्रिक्स देशांना पुन्हा धमकी ; म्हणाले,’लवकरच १०% अतिरिक्त कर…’

US Tariff on BRICS। अमेरिकेचा टॅरिफ बॉम्ब दिवसेंदिवस अधिकाधिक देशांवर स्फोट होत आहे. सोमवारी जपान आणि कोरियासह १४ देशांवर २५ ते ४०% पर्यंतचे कर जाहीर करण्यात आले होते, तर ट्रम्प यांनी सात देशांना कर पत्रे पाठवली. यासोबतच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्सना पुन्हा एकदा धमकी दिली आहे की त्यांच्यावर लवकरच १०% कर लादला जाईल.
‘अमेरिका लवकरच ब्रिक्सवर शुल्क लादणार’ US Tariff on BRICS।
एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मंगळवारी अनेक देशांवर कर लादण्याची घोषणा करताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की ते ब्रिक्स देशांबाबतच्या त्यांच्या भूमिकेवर ठाम असून ते डगमगणार नाहीत. रविवारी त्यांनी ब्रिक्स देशांना शुल्क लावण्याची धमकी दिली होती आणि ब्रिक्स देशांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. याबाबत, ट्रम्प यांनी मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले की अमेरिका ‘लवकरच’ ब्रिक्स देशांमधून होणाऱ्या आयातीवर १०% अतिरिक्त शुल्क लादेल.
ट्रम्प ब्रिक्सवर का नाराज आहेत? US Tariff on BRICS।
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, “शुल्क लादण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि ब्रिक्समध्ये असलेल्यांना लवकरच १०% अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.” असे म्हटले आहे. त्याअगोदर ब्रिक्स देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर शुल्क लादण्याच्या आपल्या योजनेचा पुनरुच्चार करताना त्यांनी म्हटले की हा ब्लॉक केवळ अमेरिकन हितसंबंध कमकुवत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा आणि इतरांनी ब्रिक्सवरील त्यांच्या टॅरिफ धमकीवर टीका केल्यानंतर ट्रम्प यांचे हे ताजे विधान आले आहे. लूला तर म्हणाले की जगाला सम्राटाची गरज नाही.
तारखेबाबत सस्पेन्स कायम आहे.
मात्र मंगळवारीही डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्सवरील शुल्क लागू करण्याची तारीख जाहीर केली नाही. सोमवारी वृत्तसंस्थेच्या वृत्तात या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे की ट्रम्प प्रशासन केवळ तेव्हाच शुल्क लादेल जेव्हा देश अमेरिकाविरोधी धोरणे स्वीकारतील. तसेच ब्रिक्सबाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका अजूनही कडक आहे आणि त्यांनी कोणताही पुरावा न देता असा दावा केला की ब्रिक्सची स्थापना अमेरिकेला हानी पोहोचवण्यासाठी आणि जगातील राखीव चलन म्हणून अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला हानी पोहोचवण्यासाठी करण्यात आली आहे आणि ते हे होऊ देणार नाहीत.
‘प्रत्येक प्रत्युत्तर शुल्कावर शुल्क वाढेल…’
डोनाल्ड ट्रम्प जगभरातील देशांना सतत टॅरिफ पत्रे पाठवत आहेत, ज्यामध्ये त्यांच्यावर लादलेल्या नवीन टॅरिफची माहिती आहे, जी पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल. ही पत्रे विविध देशांना ‘स्वीकारा किंवा सोडा’ असा अल्टिमेटम देऊन पाठवली जात आहेत. यासोबतच, ट्रम्प हे देखील स्पष्टपणे इशारा देत आहेत की अमेरिकेच्या आयात शुल्कावर कोणत्याही देशाने प्रत्युत्तरात्मक शुल्क आकारल्यास अमेरिकेकडून आयात शुल्कात आणखी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.





