अमेरिका- दक्षिण कोरियाचा संयुक्त युद्धसराव

सेल – अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांचा हवाई कारवाईचा युद्धसराव दक्षिण कोरियाच्या द्विपसमुहाजवळ करण्यात आला आहे. या युद्धसरावासाठी अमेरिकेची बी-१ बी लढाऊ विमाने दक्षिण कोरियाकडे गेली झाली आहेत. उत्तर कोरियांने दक्षिण कोरियाच्या हद्दीमध्ये घाणीने भरलेले शेकडो बलून पाठवले होते.
तसेच दक्षिण कोरियातील जीपीएस सिग्नल जॅम देखील केले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्याचवेळी हा युद्धसराव आयोजित केला गेला. आज झालेल्या युद्धसरावादरम्यान अमेरिकेच्या बॉम्बर विमानांनी थेट लक्ष्यावर बॉम्बफेकीचा सराव केला. या सरावामध्ये दक्षिण कोरियाच्या एफ-१५ के विमानांनी देखील सहभाग घेतला.
अमेरिकेच्या बॉम्बरनी दक्षिण कोरियाच्या एफ-३५ ए आणि केएफ-१६ लढाऊ विमानांसह तसेच यूएस एफ-३५ बी आणि एफ-१६ जेट विमानांसह संयुक्त हवाई कवायतीही केल्या. सरावासाठी तैनात केलेल्या बी-१ बी विमानांची संख्या किती होती, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. सात वर्षांनी या दोन्ही देशांदरम्यान अशा प्रकारचा लढाऊ विमानांचा संयुक्त युद्धसराव करण्यात आला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये दोन्ही देशांमध्ये असा सराव करण्यात आला होता.





