अमेरिका संरक्षण प्रणाली इस्त्रायलला पाठवण्याच्या तयारीत; रशियाच्या इशाऱ्यानंतर थाड करणार तैनात

मॉस्को – रशियाने इस्रायलला इराणवर हल्ला करण्याचे धाडस करू नये असा इशारा काही दिवसांपूर्वीच दिला होता. त्या पाश्र्वभूमीवर आता अमेरिका इस्रायलला लष्करी मदत देण्याच्या तयारीत व्यस्त आहे. अमेरिकेने आपली प्रगत अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली इस्रायलला पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
इराणवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलला संरक्षण मिळावे यासाठी अमेरिका ही यंत्रणा तैनात करत आहे. दरम्यान, इराणने अमेरिकेला आपले सैन्य इस्रायलपासून दूर ठेवण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिका लवकरच इस्रायलमध्ये टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स अर्थात थाड हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करणार आहे. ही यंत्रणा इराणची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे रोखण्यास सक्षम आहे.
रविवारी पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी पॅट रायडर यांनी एका निवेदनात सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या निर्देशानुसार संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी 13 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी मिशन सुरू केले होते. टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स म्हणजे थाडची बॅटरी आणि यूएस सैन्याची एक टीम मागवण्यात आली आहे.
दरम्यान, इराणने अमेरिकेला आपले सैन्य इस्रायलपासून दूर ठेवण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलमध्ये थाड ही अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करण्याच्या अमेरिकेच्या योजनेवर इराणने हा इशारा दिला आहे.
या युनिटची गुंतागुंतीची प्रक्रिया चालवण्यासाठी तिथे अमेरिकन सैनिकही तैनात केले जातील. अशा स्थितीत इराण किंवा त्याच्या समर्थित संघटनांकडून इस्रायलवर हल्ला केल्यास अमेरिकन सैनिकही असुरक्षित होऊ शकतात. इराणने म्हटले आहे की, आपल्या सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेने त्यांना इस्रायलमध्ये तैनात करू नये.
इराणने 180 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती
1 ऑक्टोबर रोजी इराणने एकाच वेळी 180 पेक्षा जास्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला केला. यातील बहुतांश क्षेपणास्त्रे इस्रायल आणि अमेरिकेने पाडली आहेत. पण काही क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भेदण्यात यशस्वी ठरली.
आता इराणच्या हल्ल्याला उत्तर म्हणून इस्त्रायलने मोठी कारवाई करण्याची धमकी दिली आहे. इस्रायल मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. तो इराणमधील हल्ल्याच्या ठिकाणांची यादीही बनवत आहे.





