US agrees to trade deal : अमेरिकेने भारतावर लादलेले 25% आयात शुल्क आता 18% वर आणले
US agrees to trade deal :

US agrees to trade deal : भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना आज एक मोठे यश मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ (परस्पर आयात शुल्क) २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी युद्धाचे ढग विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रशियन तेलाचा त्याग आणि नवा करार –
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे मान्य केले आहे. त्याऐवजी भारत आता अमेरिका आणि व्हेनेझुएला कडून मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आयात करणार आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारताचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
करारातील मुख्य मुद्दे:
आयात शुल्कात कपात: अमेरिकेने भारतावर लादलेले २५% आयात शुल्क आता १८% वर आणले आहे. गेल्या वर्षी भारताच्या ‘लिबरेशन डे’ टॅरिफ आणि रशियन तेलाच्या आयातीमुळे हे शुल्क लादण्यात आले होते.
भारताकडूनही सवलती: अमेरिकेच्या बदल्यात भारतदेखील अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्यावर आणण्यासाठी पावले उचलणार आहे.
‘बाय अमेरिकन’ संकल्पना: भारताने ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची अमेरिकन ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी उत्पादने आणि कोळसा खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे.
पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांच्याकडून कौतुक –
ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे वर्णन ‘एक सामर्थ्यवान आणि आदरणीय नेते’ असे केले आहे. “आम्ही दोघेही काम पूर्ण करण्यावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. या व्यापार करारामुळे भारत आणि अमेरिकेचे नाते अधिक घट्ट होईल,” असे ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत निवेदनात नमूद केले आहे.
या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असून जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंची स्पर्धात्मकता वाढण्याची चिन्हे आहेत.





