Urun-Ishwarpur : जयंत पाटलांना मोठा धक्का ! उरुण-ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र
ईश्वरपूर शहरामध्ये बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी उरुण- ईश्वरपूरचे (Urun-Ishwarpur) लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवल्याचा आदेश जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी दिला.

Urun-Ishwarpur : ईश्वरपूर शहरामध्ये बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी उरुण- ईश्वरपूरचे (Urun-Ishwarpur) लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवल्याचा आदेश जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी दिला. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.
याबाबत माहिती अशी, उरुण-ईश्वरपूरचे (Urun-Ishwarpur) नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी भूमापन क्र. ८/१अ, ८/१अ/१२, ८/१अ/१३, ८/१ब, ८/२ व ११ या मिळकतींमध्ये पेठ- सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करुन बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केले आहे, अशी माहिती शिवसेनेचे पदाधिकारी जयकर उर्फ घनश्याम जाधव यांनी माहिती अधिकारातून घेतली होती.
त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे 2 फेब्रुवारी 2026 रोजी रीतसर तक्रार दाखल केली होती. यामुळे ईश्वरपूर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या तक्रारीवर 7 तारखा झाल्या. जयकर जाधव यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कागदपत्रे, सातबारा उतारे, फेरफार नोंदी, नकाशे, भूअभिलेख विभागाचा अभिप्राय तसेच इतर पुराव्यांचे परीक्षण केले.
19 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार निकालासाठी ठेवली होती. जिल्हाधिकारी काय आदेश देणार याकडे ईश्वरपूर (Urun-Ishwarpur) शहरासह वाळवा तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर 10 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केला. त्यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम कलम ४४(१) (e) मधील तरतुदीनुसार उरुण- ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरविण्यात आले.
हा निकाल मान्य नसल्यास राज्य शासनाकडे हा आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत अपिल दाखल करता येईल. असे आदेशामध्ये म्हटले आहे. या आदेशामुळे ईश्वरपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात होणाऱ्या कायदेशीर आणि राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






