Uruli Kanchan | उरुळी कांचनला स्वतंत्र अग्निशमन केंद्र ; पीएमआरडीएकडून 11 कोटींचा निधी

प्रभात वृत्तसेवा
उरुळी कांचन – पूर्व हवेली, दौंड व पुरंदर परिसरातील वाढत्या आग दुर्घटनांवर नियंत्रणासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे पीएमआरडीएच्या वतीने स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 11 कोटी 4 लाख 29 हजार 760 रुपयांचा निधी वर्ग झाल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन यांनी दिली.
हे केंद्र ग्रामपंचायत हद्दीतील कांचन सिटी येथे दोन एकर जागेत उभारण्यात येणार असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे व अग्निशमन विभागप्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी बुधवारी (दि. 26) उरुळी कांचन येथे यासंदर्भात पाहणी केली.
संतोष कांचन यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे अनेक वर्षे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून परिसरातील व्यापारी व नागरिकांतून कांचन यांचे कौतुक होत आहे.सध्या आग लागल्यास वाघोली किंवा हडपसर येथून अग्निशमन बंब बोलवावा लागत होता.
त्यामुळे उशीर होऊन मोठे आर्थिक नुकसान होत असे. नवीन केंद्र उभारल्याने आगीसारख्या दुर्घटनांवर तातडीने उपाययोजना करता येणार असून तीव्रताही कमी होणार आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक व शहरी विकास होत असल्याने हे अग्निशमन केंद्र अत्यावश्यक होते.
“उरुळी कांचन येथे अग्निशमन केंद्राच्या उभारणीमुळे पूर्व हवेली, दौंड, पुरंदर परिसरातील दुर्घटनांवर तातडीने आळा बसणार आहे. पीएमआरडीएद्वारे उभारण्यात येणारे हे केंद्र सर्व सोयींनी सुसज्ज असेल.”
– संतोष कांचन, संचालक, यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर.





