Shankar Patil Suicide – उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते शंकर पांडुरंग पाटील (वय 48) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आश्रम रोड परिसरातील राहत्या घरात रविवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मानसिक वेदना व आयुष्यातील काही धक्कादायक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. माझ्या मरणास कोणीही जबाबदार नाही. मी स्वतःच्या इच्छेने हा निर्णय घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट नमूद केल्याचे समजते. चिठ्ठीत त्यांनी भारतामध्ये इच्छामरणाचा कायदा नसल्याची खंत व्यक्त केली आहे. मला जिवंतपणीच अवयवदान करायचे होते. माझ्या अवयवांमुळे चार-पाच लोकांचे आयुष्य वाचले असते. न अवयवदान शक्य असल्यास ते करावे, अशी इच्छाही नमूद केल्याचे सांगितले जाते. तसेच आपल्या आयुष्यात साथ दिलेल्या मित्रांचे आणि सहकार्यांचे आभार मानत आई-वडील, नातेवाईक व मित्रांची माफी मागितली आहे. माझ्या या निर्णयामुळे तुम्हाला त्रास होणार असेल तर मला माफ करा, असे भावनिक शब्द त्यांनी लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.चिठ्ठीत त्यांनी संजूच्या निधनानंतर माझी जगण्याची इच्छा उरली नाही. त्या घटनेचा मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर झालेल्या अपघातामुळे माझी मानसिक अवस्था अधिकच खालावली. मला झोप येत नाही, असेही नमूद केल्याचे समजते. वृद्ध आई-वडिलांची सेवा करता न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शंकर पाटील हे अविवाहित असून सामाजिक कार्यात सक्रिय होते. कस्तुरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळे, आषाढी वारीदरम्यान वारकर्यांसाठी अन्नदान सेवा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने पुढाकार घेत असत.