Shindawane Ghat Accident : शिंदवणे घाटात काळाचा घाला! भरधाव रिक्षा उलटून इनोव्हाला धडक; ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू
Shindawane Ghat Accident : शिंदवणे घाटातील अरुंद रस्ता आणि तीव्र वळणे बनली 'डेथ ट्रॅप'; अपघात रोखण्यासाठी नागरिकांची वेगनियंत्रक बसवण्याची मागणी.

Shindawane Ghat Accident – जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात भरधाव वेगातील रिक्षा उलटून समोरून येणार्या इनोव्हा कारला जोरदार धडक दिल्याने रिक्षातील एका 85 वर्षाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 24) सायंकाळी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे ब्रिजच्या पुढील वळणावर हा अपघात झाला. यमुना साहेबराव जगताप (वय 85, रा. राजेवाडी, ता. पुरंदर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
तर विजय साहेबराव जगताप (वय 52, रा, राजेवाडी) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सलमान रहीस तांबोळी (वय 27, रा. नढेनगर, काळेवाडी पिंपरी चिंचवड) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. 24) सायंकाळी पाऊणेपाच वाजण्याच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) गावाच्या हद्दीत घाटातील तीव्र वळणावर रिक्षा (एमएच 12 एनडब्ल्यू 4933) वरील चालक विजय जगताप यांनी वेगमर्यादा न पाळता निष्काळजीपणे वाहन चालविले.
वळणावर नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी झाली व समोरून येणार्या इनोव्हा (एमएच 12 एलपी 0083) या गाडीला धडक बसली.इ अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी रुग्णवाहिकेचे संतोष झोंबाडे, माऊली लाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ नागरिकांच्या मदतीने जखमी झालेल्यांना उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या अपघातात यमुना जगताप यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
घाटातील वळणे धोकादायक
शिंदवणे घाटातील अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि वाढता वेग यामुळे वारंवार अपघात होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. प्रशासनाने येथे वेगनियंत्रण व इशारा फलक वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




