मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी

Manoj Jarange Protest | मनोज जरांगे यांचे मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलनाविरोधात केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी दुपारी तातडीची सुनावणी होणार आहे.
मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांची मोठया प्रमाणात गैरसोय होत असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिककर्त्यांनी केली होती, ती न्यायालयाने मान्य केली. मुंबई उच्च न्यायालयाला सुट्टी असूनही या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. एमी फाउंडेशनने सदर याचिका दाखल केल्याचे समजत आहे.
न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे दुपारी दीड वाजता ही तातडीची सुनावणी होणार आहे. जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर असल्याचे म्हणत मुंबई हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
दरम्यान, मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जमले आहेत. आंदोलक सीएसटी रेल्वे स्थानकात जिथे जागा मिळेल आसरा घेत आहेत. याशिवाय मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागत आहे. मात्र आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रॅपिड अॅक्शन फोर्ससह मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा :
रणबीर कपूरने केलं बाप्पाचं विसर्जन, आलिया भट्ट नसल्याने नेटकऱ्यांनी साधला निशाणा





