Urea Shortage: खतासाठी पोलिसांचा पहारा! अन्नदात्यावर आली ‘ही’ भयंकर वेळ; सरकार नेमके करतंय काय?
Urea Shortage: ऐन हंगामात मावळ तालुक्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा; गरजेच्या तुलनेत केवळ ३० टक्केच पुरवठा झाल्याने भात उत्पादक शेतकरी हवालदिल.

Urea Shortage – मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसमोर ऐन हंगामात युरिया खताच्या तुटवड्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. भात पिकाला खताची नितांत गरज असताना तालुक्यात युरिया मिळेनासा झाला आहे. या गंभीर परिस्थितीकडे कृषी विभाग आणि स्थानिक राज्यकर्त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने मावळचा बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे.
मावळ तालुका हा पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला आणि कोकण किनारपट्टीला लागून असल्याने येथे भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सिंचनाच्या पाण्यावर मान्सूनपूर्व भातपेरणी केली होती. सध्या ही भातरोपे हिरवीगार झाली असून त्यांना वाढीसाठी युरिया खताची तातडीने आवश्यकता आहे. मात्र, कृषी केंद्रांवर खतच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
युरिया खताची टंचाई इतकी भीषण आहे की, एखाद्या कृषी केंद्रावर खताची गाडी आल्यास शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चक्क पोलीस प्रशासनाची सुरक्षा घेण्याची वेळ खत विक्रेत्यांवर आली आहे. खतासाठी शेतकऱ्यांना रणरणत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. खत विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाकडून एकूण गरजेच्या तुलनेत केवळ ३० टक्केच खताचा पुरवठा झाला आहे.
उर्वरित ७० टक्के साठा कधी येणार, याचे कोणतेही ठोस उत्तर प्रशासनाकडे नाही. खत उपलब्ध नसल्यामुळे पवनानगर परिसरातील केंद्रांवर लोणावळा, तळेगाव, कार्ला, सोमाटणे या भागांतील शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. एकीकडे खताचा तुटवडा असताना, दुसरीकडे काही खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.
“युरिया खतासोबत अन्य महागडी खते किंवा औषधे खरेदी करा, तरच युरिया मिळेल,” अशी सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या थेट पिळवणुकीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कृषी विभागाचा या काळ्याबाजारावर वचक राहिला नसल्याचे चित्र आहे.
“मावळ तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा पाहिजे तसा होत नाही. दुकानदारांच्या गोडाऊन मध्ये खत असूनही वेळेत न दिल्यामुळे अचानक एकदम एकदम खत देण्यास सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. योग्य नियोजन करून खत दिले तर शेतकऱ्यांची अडचण होणार नाही.या कृषी केंद्रावर १०० ते २०० शेतकरी खत खरेदीसाठी उभे आहेत.त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना पुरेसा खत पुरवठा करावा.”
– विठ्ठल पांडे, शेतकरी
“भात शेतीसाठी युरिया हा मुख्य घटक आहे. शासनाने तो त्वरित उपलब्ध करून दिला नाही, तर यंदा भाताच्या उत्पादनात मोठी घट होत शेतकरी कर्जबाजारी होईल.”
– रामभाऊ डोंगरे, भात उत्पादक शेतकरी






