Farmers Success Story: जावा-जावांची कमाल! अवघ्या ४० दिवसांत कोथिंबिरीतून कमावले लाखांचे उत्पन्न; शेतकरी कुटुंबाच्या जिद्दीला यश
Farmers Success Story: वरवंड (ता. दौंड) येथील सुजाता दिवेकर आणि शीतल दिवेकर यांनी एकत्र येत सांभाळली एक एकर शेतीची धुरा; शेतकऱ्यांसमोर ठेवला नवा आदर्श.

Farmers Success Story – शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, योग्य नियोजन आणि एकत्र कुटुंबातील सदस्यांची अथक मेहनत या जोरावर वरवंड (ता. दौंड) येथील दिवेकर कुटुंबाने कोथिंबीर लागवडीतून उल्लेखनीय यश संपादन केले. अवघ्या ४० दिवसांत एक एकर क्षेत्रातील कोथिंबिरीच्या पिकातून तब्बल १ लाख ९१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. दिवेकर कुटुंबातील सुजाता दिवेकर, शीतल दिवेकर या जावा-जावांनी एकत्रितपणे कोथिंबिरीच्या पिकाची जबाबदारी सांभाळली.
कमी पाण्यावर येणारे हे पीक निवडून त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली. सुरुवातीला शेताची रोटर व कल्टी करून मशागत करण्यात आली. त्यानंतर दर्जेदार धण्याच्या बियाण्यांची निवड करून त्यावर बुरशीनाशक प्रक्रिया करण्यात आली आणि पेरणी करण्यात आली. पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळावे यासाठी स्प्रिंकलर सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. घरातील मुलांनीही स्प्रिंकलर यंत्रणा उभारण्यात मोलाची मदत केली. पिकाच्या वाढीदरम्यान तणनाशक, कीटकनाशक आणि आवश्यक फवारण्यांचा योग्य वापर करण्यात आल्याने कोथिंबिरीचे दर्जेदार पीक तयार झाले.
बाजारात कोथिंबिरीला सध्या चांगला भाव असल्याने व्यापारी नामदेव मीटे आणि सचिन ठोंबरे यांनी थेट शेतात येऊन कोथिंबिरीची खरेदी केली. यामुळे दिवेकर कुटुंबाला अवघ्या ४० दिवसांत १ लाख ९१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दिवेकर कुटुंब हे एकत्र कुटुंब पद्धतीचे उत्तम उदाहरण मानले जाते. कुटुंबात शेतीची जबाबदारी प्रामुख्याने सुजाता दिवेकर, शीतल दिवेकर आणि त्यांच्या सासऱ्यांकडे असते. योग्य नियोजन आणि कष्टाच्या बळावर शेतीत चांगले उत्पन्न मिळविता येते, हे दिवेकर कुटुंबातील या जावा-जावांनी सिद्ध करून दाखविले आहे.




