El Nino impact: शेतकऱ्यांनो घाई नको! १५ जूनपूर्वी पेरणी केल्यास ओढवणार ‘हे’ मोठे संकट; कृषी विभागाचा इशारा
El Nino impact: एल निनो'मुळे मान्सूनवर अनिश्चिततेचे सावट; जमीन पूर्णपणे भिजून वाफसा तयार झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन.

El Nino impact – यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने हजेरी लावलेली नसल्याने खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जूनच्या दुसर्या पंधरवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असली तरी 15 जूनपर्यंत पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
जमीन पूर्णपणे भिजून वाफसा तयार झाल्याशिवाय पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे किमान 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच बियाणे पेरण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे. पूर्व हवेलीतील नवा मुठा उजवा कालवा सुरू असल्याने लाभक्षेत्रातील विहिरींची पाणीपातळी सध्या समाधानकारक आहे. मात्र कालवा बंद झाल्यास या भागालाही पाणीटंचाईचा फटका बसू शकतो.
पावसाअभावी हिरव्या चार्याचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका दुग्धव्यवसायाला बसत आहे. चारा व खाद्याचे दर वाढले असताना दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अनेकांनी गायी खरेदीसाठी घेतलेली कर्जे व आगाऊ रकमेची परतफेड करणेही कठीण बनले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पीकविम्यावर विसंबून असतो.
मात्र पावसाचा खंड, वाढते नुकसान आणि प्रत्यक्ष शेतपातळीवरील परिस्थिती असूनही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकर्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार आहे. प्रशासनाने विमा कंपन्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बळीराजामधून होत आहे.
बियाणे-खत बाजारात शेतकर्यांची अडवणूक
मान्सूनच्या अनिश्चिततेचा फायदा घेत काही विक्रेत्यांकडून बियाणे व खतांच्या किमती वाढवल्या जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. काही ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकर्यांची अडवणूक केली जात असल्याचीही चर्चा आहे. बोगस बियाण्यांच्या विक्रीची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने भरारी पथके सक्रिय करून साठेबाज व फसव्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
धरणांतील पाणीसाठा तळाला
पुणे जिल्ह्यातील विविध धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून अनेक ठिकाणी पाणीपातळी चिंताजनक बनली आहे. धरणांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. धरणक्षेत्रातील विहिरी व कूपनलिकांनीही तळ गाठण्यास सुरुवात केली असून वेळेत पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कृषी विभागाचा सल्ला
– 15 जूनपूर्वी पेरणीची घाई करू नये.
– किमान 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.
– उताराला आडवी व रुंद सरी-वरंबा पद्धत वापरावी.
– पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरेल यासाठी उपाययोजना कराव्यात.
– पुरेशी ओलावा नसताना केवळ ढगाळ वातावरण पाहून पेरणी टाळावी.






