वक्फ विधेयकामुळे रालोदमध्येही अस्वस्थता; ‘या’ नेत्याने केला पक्षाला रामराम

लखनौ : उत्तरप्रदेशातील राजकीय पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय लोक दलाचे (रालोद) प्रदेश सरचिटणीस शाहेजब रिझवी यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे जेडीयूपाठोपाठ रालोद या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधील दुसऱ्या घटक पक्षात वक्फ दुरूस्ती विधेयकावरून असणारी अस्वस्थता उघड झाली. केंद्रीय मंत्री आणि रालोदचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे नाराज होऊन पक्षातून बाहेर पडत असल्याचे रिझवी यांनी जाहीर केले. आगामी काळात आणखी काही नेते माझ्यासारखे पाऊल उचलतील. रालोदला मोठ्या संख्येने मुस्लिमांची मतं मिळाली. मात्र, वक्फ विधेयकाला पाठिंबा देऊन चौधरी यांनी मुस्लिमांचा विश्वासघात केला. ते विधेयक मुस्लिमांच्या भावना आणि अधिकारांविरोधात आहे, असे त्यांनी म्हटले.
रालोदचा प्रामुख्याने पश्चिम उत्तरप्रदेशात मोठा प्रभाव आहे. त्या पक्षासारखी अस्वस्थता याआधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूमध्ये दिसून आली. वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्याने नाराज झालेल्या जेडीयूमधील काही नेत्यांनी त्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांना विधेयकावरून राजकीय हादरे बसू लागल्याचे दिसून येत आहे.





