Pune crime : ताम्हीणी घाटातील बेवारस मृतदेहाच्या खुनाचा उलगडा; सख्या भावानेच केला खून

पुणे – ताम्हिणी घाटातील बेवारस मृतदेहाचे गूढ उकलले असून हा खून सख्या भावानेच केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अनिकेत शिर्के ( २६, रा. कर्वेनगर, पुणे) यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.अनिकेत हा धाकटा भाऊ ऋषिकेशसह २५ जुलै रोजी रात्री ९ वाजता गावी देवदर्शनासाठी दुचाकीवरून गेला होता.
ताम्हिणी घाटातील गोणवडी गावाजवळ रात्री दारू, गांजाच्या व्यसनावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात अनिकेतने लोखंडी हत्याराने भावावर हल्ला करत त्याचा खून केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.२६ जुलै रोजी कर्वेनगर चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे यांना एका खबऱ्याने अनिकेत शिर्केने आपल्या सख्या भावाचा घाटात खून केल्याची माहिती दिली.
त्यांनी तत्काळ पावले उचलत सर्च ऑपरेशन राबवत अनिकेतला कर्वेनगरमधील टेकडी परिसरात अटक केली. अनिकेतकडून मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर त्यास पौड पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी केली.





