rain update : मराठवाड्यात अवकाळीचे थैमान! वीज कोसळून आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर – राज्यासह काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यात वीज कोसळून आतापर्यंत २७ नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच ४ हजारांहून अधिक हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
राज्यात मे महिन्याच्या सुरूवातीला मशागतीच्या कामाला सुरूवात होते. यात खरिपासाठी जमीन तयार करून ठेवण्याचे काम मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी सुरू होते. ३ मेपासून अचानक आभाळ भरून येणे, विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला.
यामुळे मराठवाड्यात विज कोसळून आतापर्यंत २७ नागरिकांचा मृत्यू, तर २१ जण जखमी झाले. यात सर्वाधिक ७ जण जालना जिल्ह्यातील आहेत.
त्या पाठोपाठ नांदेड आणि बीडमध्ये प्रत्येकी ५ जण दगावले आहेत. यंदा मराठवाड्यात वीज कोसळून होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, गतवर्षी राज्यात एकूण ७६ मृत्यूंची नोंद झाली होती.





