Union Budget 2025: स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज स्वस्त होणार? सरकारकडून अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

Union Budget 2025 Expectations: 1 फेब्रुवारी 2025 ला केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. करात सवलत, नवीन योजना यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी व्हाव्यात, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला देखील या अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत.
सरकारकडून इलेक्ट्रॉनिक क्षेत्राबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती कमी होतील. गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. मागील अर्थसंकल्पात यासाठी जवळपास 15000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे या क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत.
सरकारचे विशेष लक्ष सेमीकंडक्टरच्या निर्मितीवर आहे. तसेच, स्मार्टफोन उत्पादनावरही सरकारकडून भर दिला जात आहे. त्यामुळे सरकारने यासंबंधित कोणतीही घोषणा केल्यास स्मार्टफोन व त्याच्याशी संबंधित पार्ट्सच्या किंमती कमी होऊ शकतात.
इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील आयात शुल्क कमी करावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. सरकारे यासंदर्भात निर्णय घेतल्यास देशांतर्गत पातळीवर फोनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दिलासा मिळेल. शुल्क कमी झाल्यास याचा थेट फायदा ग्राहकांनाही मिळेल. सरकारने अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केल्यास स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एससीसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील.




