पुणे – भारतीय जनता पक्ष हा विचाराने आणि लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. निवडणूक असो वा नसो बारा महिने २४ तास भाजपचा कार्यकर्ता काम करत असतो. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बिकट आहे. शहराला देशातील सर्वोत्तम शहर करायचे असेल, तर मोदींशिवाय पर्याय नाही. आम्हाला केवळ सत्ता नको , तर जनतेची सेवा करायची आहे, असे मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपचे उमेदवार सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड यांच्या प्रचाराचा शुभारंभ बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांसह भाजप व आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात आणि देशात आज डबल इंजिन सरकार आहे. शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी शहरातसुद्धा भाजपला बहुमत द्या, असे आवाहन आमदार शिरोळे यांनी केले. स्वर्गीय मंत्री चंद्रकात छाजेड साहेबांचा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आणि स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांची काम करण्याची धमक घेऊन आम्ही चारही उमेदवार या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू. याशिवाय बोपोडी परिसरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले.