PUNE: हडपसरमध्ये खासगी ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे; वाहतूक कोंडी अन् अपघातास निमंत्रण

हडपसर – खासगी ट्रॅव्हल्स बसने हडपसरमध्ये मुख्य रस्त्यावरच अनधिकृत घेतलेले थांबे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने या रस्त्यांवर अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेक वेळा दोन ट्रॅव्हल बसमध्ये अडकुन अपघातही झाले आहेत. रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत या खासगी ट्रॅव्हल बस रस्त्याच्या एक तृतीयांश भागापर्यंत उभ्या राहत आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
तर सोसायटी धारकांना घरी ये-जा करताना वादाला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस कर्मचारी येथे असतानाही तासनतास या खासगी ट्रॅव्हल बसेस रस्त्यावर वाहतुकीस अडथळा करून उभ्या असतात. याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. हडपसर येथील पुणे- सोलापूर महामार्ग हा वर्दळीचा आहे. याशिवाय वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे. त्यात खासगी ट्रॅव्हल बसेस रस्त्यावर उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडीसह अपघातास निमंत्रण मिळत आहे.
खासगी ट्रॅव्हल बसेसला दुसरीकडे थांबे देण्यात यावेत, या बसेसवर नियमित कारवाई करण्यात यावी, हे अनाधिकृत थांबे वर्दळीच्या हद्दीबाहेर हलवावे, वैयक्तिक मालकीची जागा भाड्याने घेऊन तेथूनच या ट्रॅव्हल बसेस सोडण्यात याव्यात, असा अनेक उपाययोजना वर पोलीस अधिकारी,लोकप्रतिनिधी, पत्रकार व तज्ज्ञांच्या उपस्थितीत वारंवार चर्चा व बैठका घेतल्या गेल्या. आमदार चेतन तुपे यांनी याच विषयाकडे थेट विधानसभेत सभागृहाचे लक्षही वेधले होते. मात्र, त्यानंतर ही अवघ्या काही दिवसांत पुन्हा या खासगी ट्रॅव्हल्स मुख्य रस्त्यावर येवून थांबतच आहेत. त्यामुळे वाहन चालक, सोसायटी धारक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.
“आपण नियमित ट्रॅव्हल्स हाकलण्यासाठी स्टाफ नेमत आहोत. कारवाई करत असतो. सदरच्या खासगी ट्रॅव्हल्ससाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पश्चिमेकडून मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स विशेषत: जोडून सुट्ट्या आल्यावर जास्त प्रमाणात येत असतात .त्यामुळे वाहतूक कोंडी होते त्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स थांबण्यासाठी जागा मिळणे गरजेचे आहे.” – उल्हास कदम, पोलीस निरीक्षक , वाहतूक शाखा हडपसर





