अल्टिमेट टेबल टेनिस लीग : गोवा चॅलेंजर्सला विजेतेपद

पुणे – भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू हरमीत देसाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेता अलव्हारो रॉब्लेस यांच्या अविश्वसनीय कामगिरीच्या जोरावर गोवा चॅलेंजर्संने इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 चे विजेतेपद पटकावले. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या अंतिम सामन्यात गोवा चॅलेंजर्सने 8-7 अशा फरकाने गतविजेत्या चेन्नई लायन्सचे आव्हान परतवून लावले. गोवा चॅलेंजर्सचे हे पहिले जेतेपद ठरले आणि त्यांना चषकासह 75 लाखांचे बक्षीसही मिळाले. उपविजेत्या चेन्नई लायन्सला 50 लाखांचे बक्षीस मिळाले.
हरमीत देसाईने पुरुष एकेरीच्या पहिल्या लढतीत 2-1 अशा फरकाने बेनेडिक्ट डुडाचा पराभव करून गोवा चॅलेंजर्सला दमदार सुरुवात करुन दिली. डुडाने पहिला गेम 11-6 असा जिंकला, परंतु हरमीतने दुसरा गेम 11-4 असा जिंकून सामना निर्णायक गेममध्ये नेला. हरमीतने 11-8 अशी बाजी मारली. यांग्झी लियूने सुथासिनी सवेत्ताबटवर 2-1 असा विजय मिळवून चेन्नई लायन्सचे आव्हान कायम राखले. मिश्र दुहेरीत अचंता शरत कमल/यांग्झी या जोडीने 2-1 अशा फरकाने हरमीत/सुथासिनी यांचा पराभव करून चेन्नईच्या जोडीने पहिला गेम 11-7 असा जिंकला आणि दुसऱ्या गेममध्येही 11-9 असा विजय मिळवला. पण, हरमीत/सुथासिनीने तिसरा गेम गोल्डन गुणाने जिंकला.
चौथ्या लढतीत पुरुष एकेरीत शरत कमल आणि अलव्हारो रॉब्लेस यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. अनुभवी शरतच्या गोवा चॅलेंजर्सचा रॉब्लेस आक्रमकतेनं उत्तर देत होता आणि त्याने पहिला गेम 11-8 असा जिंकला. रॉब्लेसने दुसऱ्या गेममध्येही आक्रमकता कायम राखताना 7-1 अशी आघाडी मिळवली. शरतने पिछाडी 6-8 अशी कमी केली. रॉब्लेसने हा गेम 11-8 असा जिंकला. रॉब्लेसने गोल्डन गुण घेत गोवा चॅलेंजर्सला 7-5 अशी आघाडी मिळवून दिली. रिथ टेनिसन आणि सुतिर्था मुखर्जी यांच्यातल्या महिला एकेरीच्या लढतीवर जेतेपदाचा निकाल लागणार होता.
गोवा चॅलेंजर्सच्या रिथला एक गेम जिंकायचा होता, तर चेन्नई लायन्सच्या सुतिर्थाला तिन्ही गेम जिंकणे महत्त्वाचे होते. सुतिर्थाने पहिल्या गेममध्ये 11-7 असा गेम जिंकून आव्हान राखले. रिथने जबरदस्त खेळ केला. मात्र, सुतिर्थाने अविश्वसनीय पुनरागमन करताना दुसरा गेम गोल्डन गुणांनी जिंकला. सामना 7-7 असा बरोबरीत आला आणि आता तिसरा गेम जेतेपदाचा निकाल लावणारा होता. रिथने 9-5 अशी आघाडी घेतली होती. सुतिर्थाने पुनरागमनाचे प्रयत्न केले, परंतु ते असफल ठरले. रिथने 11-6 असा विजय मिळवून गोवा चॅलेंजर्सच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
निकाल
गोवा चॅलेंजर्स 8-7 चेन्नई लायन्स
हरमीत देसाई 2-1 बेनेडिक्ट डुडा (6-11, 11-4, 11-8)
सुथासिनी सवेत्तबट 1-2 यांग्झी लियू (11-7, 6-11, 5-11 )
हरमीत/सुथासिनी 1-2 शरत कमल/यांग्झी लियू (7-11, 9-11, 11-10)
अलव्हारो रॉब्लेस 3-0 शरत कमल (11-8, 11-8, 11-10 )
रिथ टेनिसन 1-2 सुतिर्था मुखर्जी (7-11, 10-11, 6-11)





