मुंबई – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. श्रेयवाद झाला नाही पाहिजे. खासकरून ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी सोडले, त्यांनी याबद्दल काहीच बोलू नये, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेसेनेला टोला लगावला. तसेच, फक्त पुतळे उभारणे म्हणजे स्मारक नव्हे, असेदेखील विधान त्यांनी केले. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना स्मारकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभा करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, फक्त पुतळा उभारणे म्हणजे स्मारक नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला काय दिले? तेच हे स्मारक देऊ शकेल, असा आमचा प्रयत्न असणार आहे. लवकरच येथे काय काय असणार? याबाबत आम्ही नंतर तुम्हाला सविस्तर सांगू, असे विधान त्यांनी यावेळी केले. तसेच, चार भिंती म्हणजे स्मारक नाही. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट म्हणजे हे स्मारक आहे. त्यापासून सर्वांना प्रेरणा मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर महाराष्ट्राला दिले तेच काम या स्मारकाने दिले पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी आत्मचरित्र कधी लिहिले नाही. त्यावर त्यांना विचारले जात होते. ते म्हणत होते, मी कपाटातील माणूस नाही. मी मैदानावरचा माणूस आहे. त्यांचे आयुष्य उघडे पुस्तक होते, असे ते म्हणाले. 23 जानेवारी 2026 पर्यंत हे स्मारक लोकांसाठी खुले होणार आहे. आम्ही हे स्मारक शिवसेनाप्रमुखांवर श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी अर्पण करणार आहोत. पहिल्या टप्पाचे काम पूर्ण झाले. पण ते काम सोपे नव्हते. अनेक अडचणी होत्या. आता टप्पा दोनचे काम सुरू होणार आहे. आराखडा तयार झाला आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना ते म्हणाले की, या स्मारकासाठी एकही झाड तोडलेले नाही. बाळासाहेबांनी नेहमी पर्यावरणावर आणि झाडांवर प्रेम केले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.