मुंबई : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभर पक्षफोडीचे राजकारण तापले असून, भाजपमध्ये इनकमिंगचा धडाका सुरू असला तरी आता आऊटगोइंगचीही सुरुवात झाली आहे. डोंबिवली-कल्याण परिसरात भाजपला मोठा धक्का बसला असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय व माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी भाजपची साथ सोडून शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला आहे. सुरेश भोईर हे जनसंघापासून भाजपमध्ये निष्ठावान कार्यरत होते. २००० ते २००५ या काळात ते नगरसेवक म्हणूनही सेवा बजावली. मात्र, पक्षातील ‘डायरेक्ट इनकमिंग’ उमेदवारांना प्राधान्य, जुन्या कार्यकर्त्यांना दुर्लक्ष आणि स्थानिक राजकीय समीकरणांकडे जाणवणाऱ्या उपेक्षेमुळे ते नाराज होते. यामुळे त्यांनी भाजपचे सक्रिय सदस्यत्व सोडले आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या सोहळ्यात शेकडो भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारीही सोबत सामील झाले. यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणुकीत भाजपला मोठे खिंडार पडले आहे. डोंबिवलीत भाजपचे वर्चस्व असलेल्या भागात सुरेश भोईर यांचा प्रभाव मोठा आहे. त्यांच्यासोबत टिटवाळा-मांडा परिसरातील अनेक नेते व कार्यकर्तेही पक्षबदल केला असल्याची माहिती आहे. यामुळे रवींद्र चव्हाण यांना वैयक्तिक धक्का मानला जात असून, निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी या प्रवेश सोहळ्यावेळी भाजपवर फटकारे लगावले. “ज्या भाजपसोबत आमची युती होती, तो आता शिल्लकच राहिला नाही. फक्त जिंकायचे म्हणून वाट्टेल ते चालवत आहेत,” असे ठाकरेंनी म्हटले. या घटनेमुळे ठाणे-पालघर जिल्ह्यातील निवडणुकीची राजकीय गती आणखी तापेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भाजपकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.