Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे करणार अनेक मोठे गौप्यस्फोट; मुलाखतीचा प्रोमो आला समोर

मुंबई : आगामी काळात राज्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई पालिका जिंकण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांचे पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असताना आता उद्धव ठाकरेंच्या स्फोटक मुलाखतीचा प्रोमो समोर आला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) सामना या मुखपत्राद्वारे ही मुलाखत घेण्यात आली असून या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध झाला आहे.या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी अनेक मोठे गौप्य्स्फोट केले असल्याचे बोलले जात आहे.
2 भागांत प्रसिद्ध होणार मुलाखत
सामनाचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. याच मुलाखतीचा प्रोमो राऊत यांनी त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केला आहे. 19 आणि 20 जुलै रोजी दोन भागांत ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीत संजय राऊतांनी ठाकरेंना अनेक रोखठोक प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनीदेखील या प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली आहेत. यामध्ये त्यांनी राज ठाकरेंवरदेखील भाष्य केले आहे. त्यामुळे आता ते कोणता मोठा गौप्यस्फोट करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांची मुलाखत
सामना
19 आणि 20 July
सर्व प्रश्नांची रोख ठोक उत्तरे! pic.twitter.com/eYvXlW0Z6z— Sanjay Raut (@rautsanjay61) July 15, 2025
काय आहे प्रोमोमध्ये?
समोर आलेल्या प्रोमोमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत तुमचा विजय झाला पण विधानसभा निवडणुकीत मात्र निराशाजनक कामगिरी झाली. यामागचं कारण काय? असा प्रश्न राऊतांनी ठाकरेंना विचारला आहे. तसेच ठाकरे म्हणजे सदासर्वदा एक संघर्ष आहे. हा संघर्ष मतलबी वाऱ्यासाठी नाही. तर आम्ही समाजासाठीच सगळं करत आहोत. माझ्या आजोबांपासून हे सगळं चालू आहे. बाळासाहेब ठाकरे होते. हा संघर्ष करण्यासाठी आदित्य ठाकरे आहे. मी आहे. आता राज ठाकरेदेखील सोबत आले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे आता ते राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर काय भूमिका जाहीर करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





