Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा ‘मास्टरस्ट्रोक’; ‘या’ दिग्गज नेत्यांनी हाती घेतली ‘मशाल’!
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी 2029 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धाराशिवमध्ये मोठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली असून ओमराजे यांच्याविरोधात तगडी तटबंदी उभारली आहे.
Uddhav Thackeray : राज्यातील सत्तासंघर्ष आणि राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे सहा खासदार आपल्या गोटात खेचले होते. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना थांबवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले होते.
आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी ठाकरेंच्या वतीने ओमराजे यांची मनधरणी करण्याचे सर्व मार्ग अवलंबले; मात्र तरीही त्यांनी अखेर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या धक्कादायक घडामोडीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट धाराशिवमध्ये जाहीर सभा घेत ओमराजे यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला चढवला होता.
आता या सर्व घडामोडींनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी 2029 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धाराशिवमध्ये मोठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली असून ओमराजे यांच्याविरोधात तगडी तटबंदी उभारली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ‘मातोश्री’वर उपस्थित राहून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटे यांच्या मनगटावर स्वतः शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेश सोहळ्यात संजय निंबाळकर, रामेश्वर शेटे यांच्यासह रामभाऊ पडवळ, भीमराव साळुंखे, अतुल बागल आणि शिवशंकर शिंदे आदी प्रमुख नेत्यांनी हाती मशाल घेतली. या वेळी धाराशिव जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, संपर्कप्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय निंबाळकर यांच्यासारखा ज्येष्ठ चेहरा आणि भाजपमधील सक्रिय नेतृत्वाच्या प्रवेशामुळे धाराशिवच्या स्थानिक समीकरणांना नवा ट्विस्ट मिळाला असून, ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच आक्रमकपणे सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.






