Uddhav Thackeray : ‘मातोश्री’वरील बैठकीला नगरसेवकांनी फिरवली पाठ; ‘या’ पक्षात प्रवेश करणार? राजकीय हालचालींना वेग
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेचे नेते आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खळबळजनक दावा केला होता. आमदार कैलास पाटील अॅापरेशन टायगरचा दुसरा भाग असतील असे ते म्हणाले होते. यानंतर धारााशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
यानंतर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला कळंब नगरपरिषदेतील १० नगरसेवकांनी दांडी मारली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कैलास पाटील यांना धक्का?
ठाकरेंचे विश्वासू मानले जाणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर या जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. गटातटाच्या राजकारणाची चर्चा रंगली आहे. जे १० नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. ते नगरसेवक ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांच्या मतदारसंघातली आहेत. नगरसेवकांनी पक्षांतर केल्यास कैलास पाटील यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का असणार आहे. या १० नगरसेवकांमध्ये ९ जनतेमधून निवडून आलेले आणि एक स्विकृत नगरसेवक आहे.
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित १० नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार?
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांशी संपर्क वाढवला होता. काही दिवसांपूर्वी कळंबमधील काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. त्यामुळे हे नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली. आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित १० नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बार्शीत १३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुढाकाराने बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुजाता डोळसे, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह तब्बल १३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये धायटीचे सरपंच, तालुका अध्यक्ष रवीभाऊ मेटकरी, जिल्हा परिषद सभापती बंडू मोटे, मनोज ढोबळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.






