उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के सुरूच; ऐन मोक्याच्या क्षणी बड्या नेत्यानं सोडली साथ

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचं बिगूल वाजल्यानंतर राजकीय पक्षांतराला मोठा वेग आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला, विशेषतः भाजपला जोरदार यश मिळालं. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
विनायक राऊत यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी राजू नाईक व दिनेश कुबल यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दिनेश कुबल हे कलीना वॉर्ड क्रमांक 89 चे स्टॅंडिंग नगरसेवक असून त्यांनी आपल्या शकडो कार्यकर्त्यांसह गुरुवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. सोबतच रवींद्र घोसाळकर, राजू शेट्टी, विशाल कनावजे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश म्हणजे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पुण्यातही मोठे पक्ष प्रवेश
शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहर उपप्रमुख सुरज लोखंडे हे आज (२६ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये प्रवेश करणार आहेत. सुरज लोखंडे आपल्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाणार असून, त्यांच्यासोबत इतरही काही शिवसैनिकांचा पक्षप्रवेश होणार आहे. कालच (२५ डिसेंबर) माजी नगरसेवक अशोक हरणावळ यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता सुरज लोखंडे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटासाठी हा ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका मानला जात आहे.




