ऐन निवडणुकांच्या काळात शिंदेंचा आमदार अडचणीत; गुन्हा दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश, काय आहे प्रकरण?

MLA Mangesh Kudalkar : महायुती सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, आमदार आणि खासदार वेगवेगळ्या कारणामुळे अडचणीत सापडताना दिसत आहेत. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका प्रकरण भोवले असून त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे. यापूर्वी धनंजय मुंडे त्यांचा निकवटवर्तीय असलेला वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून पाय उतार व्हावे लागले होते. अशातच आता शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार एका प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. हे प्रकरण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले आहे.
शिवसेना शिंदे पक्षाचे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात विशेष न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कुडाळकर यांच्यावर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) जमिनीवर अतिक्रमण आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप असून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) हे आदेश दिले आहेत.
आमदार मंगेश कुडाळकर काय म्हणाले?
आमदार कुडाळकर यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून तक्रारदाराने म्हाडाने सेवासुविधा आणि बागेसाठी आरक्षित केलेल्या भूखंडावर एक सभागृह आणि अनेक व्यावसायिक आस्थापने अनधिकृतपणे बांधली, असा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर आमदार मंगेश कुडाळकर यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणी ते उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोकाटे यांच्यानंतर आता शिंदेसेनेच्या आमदारावर आरोप होत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आले आहे.





