Uddhav Thackeray । Chhagan Bhujbal | महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा रविवारी नागपूरमध्ये पार पडला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तसेच आणि अनेक दिग्गज मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामुळे अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात छगन भुजबळ यांच्याही नावाचा समावेश आहे. याबाबत त्यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. ‘तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार वाटेल तेव्हा खाली आणणार, मी तुमच्या हातातल खेळणं वाटतो का? ‘असा संतप्त सवाल भुजबळांनी केला आहे. दरम्यान, छगन भुजबळांच्या नाराजीवर विरोधकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, त्यांनाही छगन भुजबळांच्या नाराजीवर देखील भाष्य केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “भुजबळांच्या बाबतीत मला वाईट वाटलं, आता अनेकांच्या बद्दल मला आतून वाईट वाटतंय. कारण, जे एका अपेक्षेनं तिकडे गेले होते, तरी बरं घट्ट झालेलं जॅकीट आता तरी घालायला मिळालं. काही जणांची जॅकेट आणखी वाट पाहात असतील, त्यांच्याबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो, असे म्हणज छगन भुजबळांसह मंत्रिपद नाकारलेल्या आमदारांच्या नाराजीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. लाडका आमदार, किंवा लाडकी माणसं अशी सरकारची काही योजना आहे का, असेही ठाकरेंनी म्हटले. सरकारची दयना झाली आहे, त्यामुळे वहाँ नही रहना हे भुजबळांचं म्हणणं योग्य आहे. भुजबळ हे आता संपर्कात नाहीत, मात्र ते अधून-मधून संपर्कात असतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांना सूचक टोलाही लगावला आहे.